स्थैर्य , केवडिया , दि .२५: देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचा ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ पाहण्यास येणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. येथे कोरोनाकाळात प्रेक्षकांच्या संख्येवर लावण्यात आलेले निर्बंध आता हटवण्यात आले आहेत. आतापर्यंत येथे व्ह्युइंग गॅलरीत रोज ७ हजार तिकिटे दिली जात होती. आता मर्यादा नसेल.
केवडिया येथील हा जगातील सर्वात उंच पुतळा पाहण्यासाठी सध्या दररोज १५ ते २० हजार लोक येत आहेत. रेल्वेच्या जाळ्याने जोडले गेल्यानंतर आता ही संख्या रोज १ लाखापर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा आहे. सध्या तिकीट बुकिंग ऑनलाइन आहे. पण आता ऑफलाइन तिकीट विंडोची सवलतही दिली जाऊ शकते.
स्टॅच्यू ऑफ युनिटी ८ महिने राहिला बंद
कोरोनाच्या ८ महिन्यांत स्टॅच्यू ऑफ युनिटी बंद राहिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३१ ऑक्टोबरला येथे अनेक योजनांचे लोकार्पण केले होते. त्यानंतर १ नोव्हेंबर २०२० पासून तो पुन्हा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला. कोरोनाचे संकट लक्षात घेऊन पर्यटकांची रोजची संख्या २,५०० एवढी ठरवण्यात आली होती. ख्रिसमसनिमित्त ही संख्या वाढवून ७,००० करण्यात आली. आकडेवारी पाहिल्यास नोव्हेंबरमध्ये २० हजार पर्यटक केवडियाला आले होते. डिसेंबरमध्ये ही संख्या वाढून ३७ हजार झाली.