दैनिक स्थैर्य । दि. २८ डिसेंबर २०२१ । मुंबई । उद्योग विस्तारित असतांना पर्यावरण संवर्धनाचे नियम पाळून राज्य लवकरच प्रदूषणमुक्त करणार असल्याचा निर्धार पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला सदस्य विलास पोतनिस यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना ते बोलत होते.
श्री. ठाकरे म्हणाले, राज्यातील प्रदूषणासंदर्भात नियमांचे उल्लघन करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई केली जाते. राज्यातील उद्योगांना परवानगी देत असतांना पर्यावरण विभाग आणि उद्योग विभाग परस्पर समन्वयाने काम करित असून उद्योगांनी जल प्रदूषण करु नये यासाठी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्यातील नद्यांमध्ये सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्याबाबत अधिक सतर्कतेने कार्य होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
या विषयाच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सदस्य सर्वश्री जयंत पाटील. परिणय फुके, रामदास कदम आदिंनी सहभाग घेतला.