दैनिक स्थैर्य । दि. १६ डिसेंबर २०२२ । मुंबई । राज्यातील रस्त्यांमुळे विविध शहरे जोडली जात आहेत. समृद्धी महामार्गाप्रमाणे मुंबईसह मोठ्या शहरांना जोडणाऱ्या रस्त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. काही रस्ते प्रगती पथावर आहेत. अशा दर्जेदार रस्त्यांची निर्मिती करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. या रस्त्यांमुळे राज्याची एक वेगळी ओळख निर्माण करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
दै.लोकसत्ताच्यावतीने सेंट रेजिस हॉटेल येथे आयोजित गृहनिर्माण व्यावसायिकांच्या परिषदेत मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्यासह विविध विकासक उपस्थित होते.
इंडियन एक्सप्रेस समूहाचे राज्याच्या विकासात मोठे योगदान आहे. गृहनिर्माण व्यावसायिकांच्या परिषदेच्या माध्यमातून व्यावसायिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मदत होईल. लोकसत्ताने गेली 74 वर्ष राज्याच्या विकासात सहभाग घेतला आहे. दै.लोकसत्ता अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. स्वातंत्र्योत्तर कालखंडात महाराष्ट्राची वैचारिक जडणघडण करण्यात लोकसत्ताने मोठे योगदान दिले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
गृहनिर्माण विकास क्षेत्रातील नियमांमध्ये सुधारणा करून अटी व नियम काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहे. लोकांना घर परवडणाऱ्या किंमतीमध्ये मिळाले पाहिजे, याकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. छोट्या व मोठ्या घराच्या प्रकल्पांना सरकार सवलती देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. व्यावसायिकांनी त्यांच्या सुचनांचे सादरीकरण तयार करावे. यातील सर्वसामान्य लोकांच्या हिताच्या सूचनांचे स्वागत करण्यात येईल. त्याबाबत योग्य तो निर्णयही घेण्यात येईल. राज्याच्या विकासाचे निर्णय घेताना ते केवळ कागदावर न राहता निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करुन शेवटच्या घटकापर्यंत त्याचे लाभ पोहचविण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
कोविडसारख्या संकटात खूप मोठ्या प्रमाणावर घरांची खरेदी विक्री झाली. लोकांना घरे विकत घेता आली. शासन, महापालिकांना यामुळे उत्पन्न मिळाले हे पहिल्यांदा घडलं. त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोनातून विचार जर आपण केला तर त्याचा परिणाम चांगलाच होतो. हे सर्वांनी लक्षात घ्यावे. हे सरकार लोकांचे सरकार आहे. लोकहिताच्या प्रकल्पांना गती देण्यात आली आहे. शेतकरी हितासाठी घेतलेल्या निर्णयांमुळे लाखो हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल. याचा शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. समृद्धी महामार्ग हा राज्याच्या दृष्टिने गेम चेंजर प्रकल्प आहे. हा खऱ्या अर्थाने या राज्याला समृद्धी देणारा महामार्ग ठरेल, असे त्यांनी सांगितले.
मुंबईत 350 कि.मी. मेट्रोची कामे सुरू आहेत. ही कामे झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने वाहतुकीचा ताण कमी होईल. मेट्रोमुळे खूप फायदा होणार असून प्रदूषण कमी होईल. तसेच नागरिकांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळेल. कोळी बांधवांसाठी देखील सोईसुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत. जी 20 चे आपल्या देशाला अध्यक्षपद मिळाले. यानिमित्ताने मुंबई शहर सुशोभित केले. मुंबईतील विकास कामांबद्दल सर्व स्तरातून सुरु असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. धारावी प्रकल्प जगातला सगळ्यात मोठा प्रकल्प होणार असून त्यामाध्यमातून नागरिकांचे जीवनमान निश्चितच उंचावेल. प्रत्येक वार्डामध्ये एक याप्रमाणे ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरु करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिक राहतो त्या ठिकाणी सर्व मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याचा या शासनाचा निर्धार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.