
दैनिक स्थैर्य । दि. १६ मार्च २०२३ । मुंबई । राज्यातील सरकारी कर्मचारी जुन्या पेन्शच्या मागणीसाठी बेमुदत संपावर गेले आहेत. त्यानुसार, पहिल्या दिवशी राज्यातील सर्वच विभागात कर्मचाऱ्यांनी काम बंद करुन सरकारचे लक्ष्य वेधले. तर, अद्यापही ते बेमुदत संपावर ठाम आहेत. त्यामुळे, विधिमंडळ अधिवेशनात या संपाचे पडसाद उमटताना दिसून येते. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संपावर तोडगा काढण्याची मागणी विधानसभेत केली. त्यानंतर, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य करताना, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, असे आवाहन केले आहे. तसेच, ज्या संघटनांनी संपातून माघार घेतली, त्यांचे आभारही फडणवीसांनी मानले.
राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना आणि जुन्या निवृत्तीवेतन योजनेचा अभ्यास करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्याची घोषणा करत कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मंगळवारी विधानसभेत त्यांनी यासंदर्भात निवेदनही केले. मात्र, अद्यापही कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. त्यावरुन, आता विरोधकांनी सरकारला लक्ष्य केलंय. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही सरकारला प्रश्न विचारला. त्यानंतर, देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत संप मागे घेण्याचं आवाहन केलंय.