अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीसंदर्भात राज्यशासन सकारात्मक निर्णय घेणार – महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०२ सप्टेंबर २०२२ । ठाणे । स्वस्थ भारत मोहिमेत राज्यातील महिला व बालविकास विभागाच्या अंगणवाडी सेविकांचे मोठे योगदान आहे. या अंगणवाडी सेविकाचे मानधन वाढविण्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक असून लवकरच निर्णय घेईल, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज येथे केले.

महिला व बाल विकास विभागाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या वतीने आयोजित 5 व्या राष्ट्रीय पोषण महिना कार्यक्रमाचा राज्यस्तरीय शुभारंभ महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते व माजी महापौर नरेश म्हस्के, आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या उपस्थितीत ठाण्यातील काजूवाडी येथील महानगरपालिका शाळेत झाला. यावेळी श्रीमती सुमित्रा गुप्ता, उपायुक्त गोकुळ देवरे, एकात्मिक सेवा योजनेचे उपायुक्त विजय क्षीरसागर यांच्यासह लाभार्थी महिला, बालके व नागरिक उपस्थित होते.

राष्ट्रीय पोषण महिना शुभारंभानिमित्त सकस पाककृती प्रदर्शनाचे उद्घाटन मंत्री मंगलप्रभात लोढा व श्रीमती सुमित्रा गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री. लोढा यांनी अंगणवाडीतील बालकांशी व अंगणवाडी सेविकांशी संवाद साधून पोषण आहाराविषयी माहिती घेतली. गरोदर महिला व सुदृढ बालकांना सकस फ्रूट बास्केट, स्तनदा मातांना बेबी केअर किटचे वाटप मंत्री श्री. लोढा व श्री. म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आले.

श्री. लोढा म्हणाले की, राज्यातील एक लाख 10 हजार अंगणवाड्याच्या माध्यमातून राज्यातील बालके व गरोदर महिलांची काळजी घेण्याचे काम अंगणवाडी सेविका करत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मूल सक्षम तर देश सक्षम असा संदेश दिला होता. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासन काम करत आहे. अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीसंदर्भात विभागाने प्रस्ताव पाठवावा त्यावर मंत्रिमंडळात योग्य निर्णय घेऊ, असेही त्यांनी सांगितले.

श्री. मस्के म्हणाले की, महिलांचे व बालकांचे पोषण महत्त्वाचे आहे. गरोदर महिलांना योग्य व सकस आहार दिल्यास बालकाची वाढ चांगल्या पद्धतीने होते. यासाठी महिला व बालविकास विभागाच्या अंगणवाडी सेविका अतिशय उत्कृष्ट काम करत आहेत. अनेक महत्त्वाचे उपक्रमही या विभागाच्या वतीने घेण्यात येत आहेत. अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीचा प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यात यावा.

श्रीमती अग्रवाल यांनी प्रास्ताविकात पोषण महिना कार्यक्रमाची माहिती दिली. राज्यात 1 ते 30 सप्टेंबर या काळात 1 लाख 10 हजार अंगणवाड्यांच्या माध्यमातून पोषण महिना उपक्रमाअंतर्गत विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. बालकांचे वजन तपासणे, सकस आहारासंबंधी जनजागृती करणे, महिला व बालकांचे आरोग्य, शिक्षण याविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच स्वस्थ बालक-बालिका स्पर्धाही आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती श्रीमती अग्रवाल यांनी यावेळी दिली. श्री. क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी पोषण शपथ घेण्यात आली. तसेच अंगणवाडी सेविकांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.


Back to top button
Don`t copy text!