राज्य शासनाने तात्काळ वीज देयकांना स्थगिती द्यावी अन्यथा याविरोधात आंदोलन करणार : आ. अतुल भातखळकर


स्थैर्य, मुंबई, दि.22 : राज्यामध्ये गेल्या तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ लॉकडाऊन असताना सुद्धा राज्यातील वीज देयके मुंबई शहरातील अदानी सारख्या खाजगी कंपन्यांनी किंवा इतर सरकारी कंपन्यांनी ग्राहकांना अव्वाच्या सव्वा देयके आकारली आहेत. त्यामुळे या वीज वितरण कंपन्यांवर तात्काळ कारवाई करून वीज देयकांना स्थगिती देण्याची मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आमदार अतुल भातखळकर यांनी मान. मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.

प्रधानमंत्री आर्थिक पॅकेज मध्ये राज्य सरकारच्या वीज वितरण कंपन्यांकरिता रु. 90 हजार कोटींचे सहाय्य उपलब्ध करून दिले असतांनाही शासन वीज देयकं माफ करण्याची भूमिका घेत नाही हे केवळ दुर्दैवी नाही तर संतापजनक आहे अशी टीका ही आमदार भातखळकर यांनी या पत्राद्वारे केली आहे. एकीकडे कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना नागरिकांना आर्थिक दिलासा मिळण्याकरिता, 300 युनिटपर्यंत वीज देयके माफ करण्याची मागणी सातत्याने त्यांनी केली होती परंतु या सर्व गोष्टींकडे राज्य सरकारने कायम दुर्लक्ष करण्याचेच काम केले असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.

महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोग कायद्यातील कलम 4 प्रमाणे राज्यातील सर्व वीज देयकांना तात्काळ स्थगिती द्यावी व 300 युनिटपर्यंत वीज देयके माफ करून नव्याने वीज देयके आकारणी करण्यात यावी अशी मागणी आमदार भातखळकर यांनी केली असून राज्य सरकार कडून कोणतीही कार्यवाही न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही आमदार भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या या पत्रात दिला आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!