दैनिक स्थैर्य । दि. २२ ऑगस्ट २०२२ । सातारा । जिल्हयातील नाविन्यपूर्ण संकल्पना आणि नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या वतीने काढण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेच्या फिरत्या एलईडी डिस्प्ले व्हँनला जिल्हाधिकारी कार्यालय येथे झेंडा दाखवून स्टार्टअप यात्रेचा शुभारंभ अप्पर जिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सुनिल पवार व जिल्हा व्यवसाय, शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सचिन धुमाळ आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील नागरिक, विद्यार्थी, होतकरू उमेदवार यांनी आपल्या नवकल्पनांना मूर्त स्वरूप देऊन नवउद्योजक बनण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या वतीने काढण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेचा लाभ घेऊन, शासनाचे पाठबळ मिळवण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता विभागाच्या www.mssins.in किंवा www.mahastartupyatra.in या पोर्टलवर नोंदणी करून आपल्या नवकल्पना नोंदवाव्यात, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख यांनी केले.
नोंदणी केलेल्या नवकल्पनांमधून स्पर्धा घेऊन, त्यापैकी उत्कृष्ट नवकल्पनांना परितोषिक दिले जाणार आहे. जिल्हास्तरावर पहिल्या क्रमाकांचे २५ हजार रुपये, दुसऱ्या क्रमाकांचे १५ हजार रुपये व तिसऱ्या क्रमाकांचे 10 हजार रुपये देण्यात येणार असून, विभागस्तरावरील सर्वोत्कृष्ट उद्योजकला विभागाचा स्टार्टअप हिरो आणि विभागीय सर्वोत्कृष्ट महिला उद्योजकला प्रत्येकी एक लाख रुपयांचे रोख बक्षीस दिले जाणार आहे. तसेच राज्यस्तरीय विजेत्याला रोख अनुदान तसेच आर्थिक व अन्य पाठबळ पुरविण्यात येईल.
महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण, यात्रेबाबतची संपूर्ण माहिती व उद्देश, नाविन्यपूर्ण संकल्पना व त्यांचे पैलू तसेच कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती या एलईडी डिस्प्ले व्हँनवरून प्रदर्शित केली जाणार आहे. स्टार्टअप यात्रा सातारा जिल्हामध्ये 20 ऑगस्ट ते २३ ऑगस्ट, २०२२ या कालावधीमध्ये सर्व तालुक्यात प्रचार, प्रसिद्धी होणार आहे. यावेळी नाविन्यपूर्ण कल्पना असलेले नागरिक आपल्या कल्पना नोंदवू शकतील.