कास धरणाचे रखडलेले काम पुन्हा होणार सुरु, आ. शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि.३१: वाढीव निधी मिळत नसल्याने सातारकरांचा जीवनदाता असलेल्या कास धरणाच्या उंची वाढवण्याच्या कामाला ब्रेक लागला होता. ज्या ना. अजित पवारांनी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मागणीवरुन या प्रकल्पाला मंजूरी दिली होती त्याच ना. पवारांनी काही दिवसांपुर्वी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्याच मागणीवरुन कास धरण प्रकल्पासाठी वाढीव ५८ कोटी निधीला प्रशासकीय मान्यता देवून निधी मंजूर केला होता. मंजूर ५८ कोटी पैकी २५ कोटी रुपयांचा पहिला हप्ता नुकताच सातारा पालिकेकडे वर्ग झाला आहे त्यामुळे कास धरणाचे रखडलेले काम पुन्हा सुरु होणार असून हा प्रकल्प लवकरच पूर्णत्वास नेऊ, असे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे.

सातारा शहरासह कास मार्गावरील १५ गावांचा पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरुपी मिटण्यासाठी कास धरणाची उंची वाढवणे आवश्यक होते. त्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे सरकार असताना तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करुन कास धरणाची उंची वाढवण्याचे काम मंजूर करुन घेतले होते. त्याचवेळी राज्याच्या पाणीपुरवठा विभागाकडून निधीही उपलब्ध करुन घेण्यात आला होता. तसेच वन विभाग, हरित लवाद यासह अनेक विभागाच्या परवानग्याही आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या अथक पाठपुराव्यातून मिळवण्यात आल्या होत्या आणि त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली होती. सद्य परिस्थितीत कास धरण प्रकल्पाचे काम ७५ ते ८० टक्के पुर्ण झाले आहे. मात्र वाढीव निधीची तरतूद न झाल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून पुढील काम रखडले आणि कास धरण प्रकल्प पुर्णत्वास जाणार का? सातारकरांचा पाणीप्रश्‍न सुटणार का, असे प्रश्‍न निर्माण झाले होते. मात्र पुन्हा एकदा आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार ना. अजित पवार यांनी या प्रकल्पासाठी वाढीव ५८ कोटी निधी मानूर करून दिला.

आ. शिवेंद्रसिंहराजे आणि ना. अजित पवार यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध सर्वश्रुत आहेत. त्यामुळेच हद्दवाढ मंजूर झाली. मेडिकल कॉलेजचा प्रश्न सुटला तसेच सातारकरांच्या जिव्हाळ्याच्या कास धरण प्रकल्पाला मंजुरी मिळाली आणि वाढीव निधीही उपलब्ध झाला. आता ५८ पैकी २५ कोटींचा पहिला हप्ता नुकताच सातारा पालिकेकडे वर्ग करण्यात आला असून कास धरणाचे बंद पडलेले काम आता पुन्हा सुरु होणार आहे. जसजसे काम पुढे जाईल तशी उर्वरित रक्कमही पालिकेला मिळेल आणि हा प्रकल्प येत्या काही दिवसात पूर्णत्वास जाणार आहे.

आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी काही वर्षांपुर्वी शाहूपूरी येथील नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी ३१.३१ कोटी निधी मंजूर करुन घेतला होता. सध्या या योजनेचे काम प्रगतीपथावर आहे. मात्र वीज वितरण कंपनी, वन विभागचा खर्च यामध्ये धरण्यात आला नव्हता. तसेच उर्वरीत पाईपलाईनचे काम यासाठी वाढीव निधी मिळणे आवश्यक होते. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार ना. पवार यांनी या योजनेसाठी वाढीव १२ कोटी रुपये निधी मंजूर केला होता. हा निधीही उपलब्ध झाला असून शाहूपुरीच्या पाणीपुरवठा योजनेचेही पुढील काम लवकरच सुरु होणार आहे. या दोन्ही योजनांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ना. पवार यांचे आभार मानले आहेत.

हद्दवाढीत समाविष्ट रस्त्यांची कामे मार्गी लागणार
पालिका हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या भागातील रस्त्यांची कामे मार्गी लावण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांचा पाठपुरावा सुरु आहे. यासंदर्भात आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या भागातील रस्त्यांसाठी निधीची मागणी केली होती. ना. शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच या रस्त्यांसाठी भरीव निधी उपलब्ध होणार आहे. सर्व रस्त्यांची कामेही लवकरच मार्गी लागतील, असे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे.


Back to top button
Don`t copy text!