
दैनिक स्थैर्य । दि. २६ जुलै २०२२ । सातारा । पुणे-बंगळुरू महामार्गावर एसटी बस चालकाला चालत्या बसमध्ये चक्कर आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे बस रस्त्यावरुन उतरून थेट उसाच्या शेतात घुसली. या बसमध्ये तब्बल 40 प्रवासी प्रवास करत असून सुदैवाने कोणतीही दुखापत झालेली नाही.
पुणे-बंगळुरू महामार्गावर पुणे-तासगाव एसटी बस भुईंज येथे सर्व्हिस रस्त्यावरून बसस्थानकच्या दिशेने जात होती. यावेळी चालकाला अचानक चक्कर येऊन उलटी झाली. व तो स्टेरिंगवर कोसळणार इतक्यात त्याने स्वतःला सावरत बस रस्त्याकडेच्या उसाच्या शेतात नेली. यानंतर बसमधील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
दरम्यान, बसचालक प्रदीप प्रमोद माताडे (रा. तासगाव, जि. सांगली) यांना उपचारासाठी भुईंज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे. घटनास्थळी भुईंज पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे, पीएसआय रत्नदीप भांडारे, हवालदार चंद्रकांत मुंगसे, बापूराव धायगुडे, राजेश कांबळे यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने सर्व प्रवाशांना बाहेर काढले. चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानाचे सर्वच जण कौतुक करत आहेत.