स्थैर्य, खटाव, दि. 25 : जगात करोना विषाणूने थैमान घातले आहे. करोना ला रोखण्यासाठी विविध उपाय अवलंबले जात आहेत. तरीसुद्धा करोना बाधित रूग्ण संख्या वाढत असतानाच खटाव मध्ये मात्र योग्य उपाययोजना व नियोजन केले असल्यामुळे करोना चा शिरकाव होऊ शकला नाही. त्यामुळे सध्या सर्वत्र करोना ला पराभूत करण्यासाठी ‘खटाव’ पॅटर्न राबवायला हवा अशी चर्चा होताना दिसत आहे.
खटाव मध्ये नागरिक करोना पासून सुरक्षित रहावेत यासाठी आ. महेश शिंदे, सदस्य अशोक कुदळे व युवा नेते राहुल पाटील यांनी योग्य नियोजन करत ‘खटाव’ पॅटर्नची यशस्वी संकल्पना प्रत्यक्षात साकार केली आहे. या ‘खटाव’ पॅटर्न मुळेच कोरोना खटावमध्ये दाखल होऊ शकला नाही.
आ.महेश शिंदे यांनी स्वखर्चातून खटावमधील गरीब, गरजू, अपंग अशा पाचशे कुटुंबांना धान्य वाटप केले आहे. कोरेगाव विधानसभा मतदारसंघातही त्यांनी गरजूंना मदत केली असून प्रशासनाला सोबत घेऊन काम करत आहेत.
‘खटाव’ पॅटर्न यशस्वीपणे राबविण्यासाठी युवा नेते राहुल पाटील यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. खटाव मधील ज्येष्ठ नागरिक, माजी सैनिक, पत्रकार व युवकांना एकत्र करून दक्षता कमिटीची स्थापना केली आहे. या दक्षता कमेटीच्या माध्यमातून नियोजनबद्ध आराखडा तयार करून कोरोना विरुद्धची लढाई लढली जात आहे. जिल्ह्याबाहेरून आलेल्या नागरिकांना वसतिगृहात विलगीकरण केले जात आहे. लोकांच्या आरोग्यासाठी वाईटपणा घेऊन शिस्त लावली जात आहे. गावात येणारे रस्ते पूर्ण बंद केले आहेत. गावच्या मुख्य रस्त्यावर दक्षता कमेटीचे सदस्य गस्त घालत आहेत. त्याचबरोबर जनजागृतीही केली जात आहे. त्यामुळे खटाव पॅटर्न यशस्वी झाला असून करोना खटावमध्ये शिरकाव करू शकला नाही.
दक्षता कमिटी अध्यक्ष नंदकुमार वायदंडे, उपसरपंच अमर देशमुख, सर्व ग्रामपंचायत सदस्य, दक्षता कमिटी व सर्वपक्षीय जबाबदार कार्यकर्ते कोरोना विषाणूला रोखण्यासाठी जिवापाड मेहनत घेत असल्याचे दिसते.