स्थैर्य, फलटण : शेतात मजुरी करुन प्रपंचाचा गाडा ओढणाऱ्या आई वडिलांनी आपल्या मुलांमध्ये मुलगा/मुलगी असा भेदभाव न करता दोघांना शिक्षणासाठी सारखे प्रोत्साहन दिले, त्यातून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मुलगी विक्री कर निरीक्षक आणि मुलगा नायब तहसीलदार पदावर आरुढ झाला आहे. दोघा बहीण भावासह कुटुंबाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सोनगाव, ता. फलटण येथील शेतमजूर विठ्ठल आण्णा जगताप व सौ. छाया विठ्ठल जगताप या दांपत्याने शिक्षणाचे महत्व ओळखून मुलांना कोणत्याही परिस्थितीत शिक्षणापासून वंचीत ठेवायचे नाही असा निर्धार केला, अर्धपोटी रहावे लागले, एकाद्या दिवाळी सणाला कपडे घेता आले नाही तरी चालेल पण तिन्ही मुलांना वह्या, पुस्तके, शैक्षणिक साहित्य, किंवा अन्य शालेय खर्चासाठी पैसा कमी पडू न देण्याचा निर्णय घेतला, मुलांनीही आई वडिलांचा निर्धार वाया जाऊ देणार नाही अशी मनाशी खूण गाठ बांधून अभ्यासाला पूर्ण वेळ देऊन मेहनत घेतली, आणि सर्वजण ध्येय पूर्तीच्या दिशेने धावत राहिले.
दरम्यान उच्च शिक्षणासाठी होणारा खर्च पेलताना आई वडिलांची दमछाक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर धाकटा भाऊ सुजीत जगताप याने आपले शिक्षण थांबवून आई वडिलांची आर्थिक ओढाताण कमी करण्यासाठी खाजगी दवाखान्यात कंपाऊंडरची नोकरी स्वीकारली आणि थोरल्या दोघा बहीण भावाचे शिक्षण अखंडित सुरु ठेवले.
गतवर्षी कु. वर्षा विठ्ठल जगताप हिने स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विक्रीकर निरीक्षक पद प्राप्त केले ती मुंबईत या पदावर कार्यरत असताना यावर्षी सूरज विठ्ठल जगताप याने स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून नायब तहसीलदार पद प्राप्त केले आहे.
दोघा बहीण भावांनी मोठ्या मेहनतीने स्पर्धा परीक्षेत उज्वल यश प्राप्त करुन आई वडील आणि धाकट्या भावाच्या कष्टाचे चीज केले आहे. त्याबद्दल या तिघा भावंडांसह आई वडिलांचे विविध स्तरावरुन अभिनंदन होत आहे.
दरम्यान प्रसंगी पोटाला चिमटा घेऊन रात्रंदिवस मेहनत घेऊन दोन्ही मुलांना शासकीय नोकरी स्वकष्टाने मिळविण्यासाठी आणि त्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारे आई वडील विठ्ठल आण्णा जगताप व सौ. छाया विठ्ठल जगताप या दाम्पत्याचा ग्रामस्थांनी यथोचित सत्कार केला त्यावेळी विश्वरत्न फौंडेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अविनाश कोंडीबा मोरे, सांगवी गावचे पोलीस पाटील रमेश बडचीकर, नवनाथ तुपारे, सांगवी ग्रामपंचायत सदस्य विनोद मोरे, विकास शिंदे, क्षितीज फिल्मचे दिग्दर्शक घनश्याम गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.