
स्थैर्य, मेढा, दि. 5 : जगात प्रामाणिकपणा असल्याने दिलासा मिळत आहे. याची प्रचिती सायगाव येथे पाहण्यास मिळाली. सव्वा चार लाखाचे सोने रस्त्यावर पडले होते. हे सोने उचलून मेढा पोलीस ठाण्यात जमा करून पोलीस पाटील सुहास भोसले यांनी एक आदर्श निर्माण केला आहे.
याबाबत माहिती अशी, सायगाव, ता. जावली येथे दैनंदिन काम करून खर्शी तर्फ कुडाळ, ता. जावलीचे पोलीस पाटील सुहास भोसले हे आपल्या दुचाकीवरून रविवारी रात्री घरी निघाले होते. रस्त्यावर मोटारसायकलच्या हेडलाईटच्या प्रकाशात त्यांना सोनेरी वस्तू पडल्याचे निदर्शनास आले. त्यांनी ती वस्तू उचलून थेट मेढा पोलीस ठाण्याचे स. पो. नि. नीळकंठ राठोड यांना त्वरित याबाबत मोबाईलवर सांगितले. रात्रीची वेळ असल्याने सकाळी सापडलेली सोनेरी वस्तू घेऊन या, अशी सूचना केली. त्यानुसार सुहास भोसले यांनी सकाळी मेढा पोलीस ठाणे गाठले.
मेढा बाजारातील एका सोनाराकडे ती वस्तू पोलिसांना सोबत घेऊन दाखविली. त्यावेळी ते सोन्याचेच दागिने असल्याची खात्री पटल्यानंतर त्याचे वजन केले असता त्याचे वजन 8 तोळे 3 ग्रॅम 500 मिली एवढे भरले. सदर दागिने स.पो.नि. राठोड यांच्याकडे सोपविण्यात आले. सोन्याची खात्री पटवून ते मालकाला देण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले.
दरम्यान, सायगाव येथील एका महिलेचे दागिने पडल्याची चर्चा होऊ लागली आहे. मेढा पोलिसांनी आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर दागिने देण्याची ठरविल्याने दागिने मालकाचा जीव भांड्यात पडला आहे. यापूर्वी सामाजिक बांधिलकी जपणार्या भोसले यांनी अनेक विधायक उपक्रमात सहभागी होऊन कर्तव्य जपले आहे. त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.