‘भट्टी’ या लघुपटाने घडवले समाजवास्तवाचे अस्वस्थ करणारे दर्शन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १८ ऑक्टोबर २०२२ । सातारा । ‘’ सध्याच्या काळात सिनेमाची जागृती होणे हे खूप गरजेचे आहे .आपल्याकडे सगळ्यात जास्त चित्रपट बनवले जात आहेत पण त्या चित्रपटांचे पुढे काहीच होत नाही.यासाठी चित्रपट निर्मिती करणारी टीम आणि प्रेक्षक यांनी देखील चित्रपटाच्या सर्व अंगांची माहिती करून घेणे आवश्यक आहे..कलात्मक वास्तव उभे करण्यासाठी साधनांचा कसा उपयोग करावा यासाठी चिंतनाची व कल्पकतेची आवश्यकता आहे.चित्रपटातून समजाला नवे मुल्यविचार मिळत असतात. चित्रपट समजून घेणारी दृष्टी निर्माण करण्यासाठी देखील जागृती करावी लागते. संहिता लेखनापासून ते चित्रपट उभा राहीपर्यंत अनेक बदल होत असतात. प्रेक्षकांचे काळीज पकडून ठेवणारा आणि त्यांना अंतर्मुख करून विचार करायला लावणारा चित्रपट असायला हवा’’असे मत प्रसिद्ध ‘भट्टी या लघुपटाचे लेखक व दिग्दर्शक शिवाजी करडे यांनी व्यक्त केले. ते येथील छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये मराठी विभाग व शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ कोल्हापूर यांनी  आयोजित केलेल्या ‘लघुपट,चित्रपट ,नाट्य संहितांचे लेखन ‘या या  कार्यशाळेत ‘नाट्य व लघुपट संहितालेखन कार्यशाळेत ते बोलत होते .या वेळी मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुभाष वाघमारे ,मितेश टाके,तुषार बोकेफोडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ.विठ्ठल शिवणकर यांचे मार्गदर्शनाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

लघुपट संहितालेखन संदर्भात मार्गदर्शन करताना शिवाजी करडे म्हणाले ‘’ सर्व कलेचे मूळ हे नाटकात आहे. कृतीयुक्त कथानक हा मूळ गाभा आहे .निसर्गातून माणसाला अनेक गोष्टी मिळाल्या आहेत.लाईट,मेकअप,वेशभूषा ही सुद्धा निसर्गातून माणसाने घेतली. स्वतःच्या कल्पकतेतून कलेचा उगम झाला आहे.मानवी वस्ती वाढत गेली तशी प्रत्येक गटाची संस्कृती बनत गेली .प्रतीकांचा उपयोग संस्कृतीमधून मिळाला.संस्कृतीच्या कोणत्या प्रतीकांचा उपयोग माणूस कशासाठी करतो हा देखील शोध आपण घेतला पाहिजे.

नाट्य,चित्र,नृत्य,साहित्य,कीर्तन,पोवाडा असे कितीतरी कलाविष्कार माणसांचे आहेत.यातूनच पुढे चित्रपटची आधुनिक कला जन्मास आली. या सर्व कलांचा संगम आता चित्रपटात झाला असल्याने ही कला लोकप्रिय झाली. दर काळात संहिता बदलत असते. सुखात्मिका की शोकात्मिका हे अनुभव बीजावर अवलंबून आहे.नाटक लिहिताना स्टेजचा विचार करून लिहावे लागते.स्थळ ,काळ ,वेळ यासाठी प्रकाश योजना,ध्वनी हे काम करीत असतात.नाटकात संवाद लेखन महत्वाचे असते .एकूणच पात्र,परिसर ,भावना ,भवताल ,संवाद ,कल्पना ,शंका ,रचना ,बोध या बाबींचा अभ्यास करून निर्मिती होत असते.असे ते म्हणाले. यावेळी भट्टी स्वलिखित व दिग्दर्शित शोर्ट फिल्म त्यांनी सर्वाना दाखवली हा लघुपट बघितल्यानंतर सर्वजण अस्वस्थ झाले.अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया देऊन निर्मितीचे कौतुक केले.प्रा.डॉ. विद्या नावडकर, समन्वयक डॉ.कांचन नलावडे ,डॉ.संजयकुमार सरगडे ,प्रा.प्रियांका कुंभार यांनी ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले ,सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा,डी.पी.भोसले कॉलेज कोरेगाव,कला वाणिज्य महाविद्यालय सातारा ,शरदचंद्र पवार महाविद्यालय देऊर ,तसेच अन्य महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी यांनी या कार्यशाळेत भाग घेतला.


Back to top button
Don`t copy text!