![](https://i0.wp.com/sthairya.com/wp-content/uploads/2023/11/Swami-Samarth-1.jpg?resize=709%2C354&ssl=1)
दैनिक स्थैर्य | दि. १२ फेब्रुवारी २०२५ | फलटण | श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट यांच्यावतीने निघालेल्या श्री स्वामी समर्थ ‘पालखी पादुका परिक्रमे’चे फलटण नगरीत गुरुवार, दिनांक २७ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ५:०० वाजता श्री स्वामी समर्थ मंदिर, मलठण येथे आगमन होणार असून पालखी सोहळ्याचा मुक्काम श्री स्वामी समर्थ मंदिर, अहिल्यानगर, गजानन चौक, फलटण येथे होईल, अशी माहिती श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ, अहिल्यानगर, फलटणचे प्रमुख संजय चोरमले यांनी दिली.
या पालखी सोहळ्याबाबत सविस्तर माहिती देताना संजय चोरमले यांनी सांगितले की, ‘‘श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट यांच्यावतीने निघालेल्या ‘पालखी पादुका परिक्रमा’ सोहळ्याचे यंदा २८ वे वर्ष आहे. सालाबादप्रमाणे यंदा सोहळ्याचे गुरुवार, दिनांक २७ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी 5 वाजता मलठण येथील श्री स्वामी समर्थ मंदिर येथे आगमन होईल. या ठिकाणी पालखीचे स्वागत करुन मिरवणूकीस प्रारंभ होणार आहे.’’
‘‘सदरचा पालखी सोहळा मिरवणूकीने श्री स्वामी समर्थ मंदिर मलठण येथून श्री हरिबुवा मंदिर, पाचबत्ती चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, उमाजी नाईक चौक, गजानन चौक, शंकर मार्केट, श्रीराम मंदिर मार्गे श्री स्वामी समर्थ मंदिर, अहिल्यानगर, गजानन चौक, फलटण येथे विसावणार आहे. तरी फलटण शहर व परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनाचा लाभ घ्यावा’’, असेही आवाहन संजय चोरमले यांनी केले आहे.