
दैनिक स्थैर्य । दि. ०३ नोव्हेंबर २०२२ । सातारा । सातारा जिल्ह्यातील शासकीय यादीवरील वृत्तपत्रांसह राज्यातील अनेक महत्त्वाच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या शासकीय जाहिरात बिलाची रक्कम गेल्या अनेक वर्षापासून टेंभू सिंचन यांत्रिकी व विद्युत पथक ओगलेवाडी कराड या विभागाने दिलेली नाहीत. याबाबत प्रसार माध्यम संपादक पत्रकार परिषदेचे अध्यक्ष गोरख तावरे यांनी लेखी तक्रार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
तक्रारीत म्हटले आहे की, 2013 सालापासून टेंभू उपसा सिंचन यांत्रिकी व विद्युत पथक ओगलेवाडी – कराड या कार्यालयाकडे सातारा जिल्हयाबरोबरच राज्यातील वृत्तपत्राची जाहिरात बिल येणे बाकी आहे. “राज्य शासनाकडून जाहिरात बिलासाठी आवश्यक असणारे अनुदान आम्हास प्राप्त झाले नाही. यामुळे आम्ही बिल देऊ शकत नाही”. असे वारंवार या कार्यालयाकडून सांगितले जात आहे.
विशेष म्हणजे या टेंभू उपसा सिंचन यांत्रिकी व विद्युत पथक ओगलेवाडी – कराड विभागामार्फत कामांच्या निविदा काढल्या जातात. वर्तमानपत्रात प्रसिद्ध केल्या जातात. कामाच्या निविदा भरून ठेकेदार काम घेतात. ठेकेदाराची बिले अदा केली जातात. आणि वर्तमानपत्राचीच बिले दिले जात नाही. ही गंभीर बाब गेल्या दहा वर्षाहून अधिक काळ या ठिकाणी सुरू आहे.
याबाबत अनेक वर्तमानपत्रांच्या जाहिरात व्यवस्थापकांसह पत्रकारांनी या कार्यालयाशी संपर्क साधला. मात्र या विभागाचे कार्यकारी अभियंता, मुळातच भेटत नाहीत अथवा जाग्यावर नसतात. यामुळे क्लार्क / कर्मचारी यांना पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. “अनुदान प्राप्त नाही, अनुदान मिळाले की आपले बिल अदा केली जातील” एवढेच उत्तर दिले जात आहे. यामुळे आपण याची दखल घेऊन सातारा जिल्ह्यातील वर्तमानपत्रांबरोबरच राज्यातील मोठे, मध्यम, लघु आणि विशेषता मराठी, हिंदी, इंग्रजी व इतर राज्यातील वृत्तपत्रांची जाहिरात बिल देणे, अदा करणे, आवश्यक आहे. याबाबत आपणाकडून उचित कार्यवाही व्हावी अशी अपेक्षा गोरख तावरे यांनी पत्रात व्यक्त केली आहे.
विशेष बाब म्हणजे गेल्या दहा वर्षातील कामांच्या एकूण निविदा व त्या निविदाप्रमाणे प्रसिद्ध झालेली वृत्तपत्रांची जाहिरात बिल अदा करणे आवश्यक आहे. मात्र या कार्यालयाकडे वर्तमानपत्रांनी दिलेल्या 2013 सालापासून प्रतिवर्षाप्रमाणे वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या जाहिरात बिलांची अध्ययावत यादीच नाही. वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेल्या कामाची निविदा, दिनांक, जाहिरात बिलाची रक्कम अशी यादी उपलब्ध नाही. याचा अर्थ या कार्यालयाचा सर्व कारभार अनागोंदी आहे की काय ? असा प्रश्न निर्माण झाला असून या कार्यालयाची प्रत्येक निविदाप्रमाणे झालेली कार्यवाही तपासणी करण्यात यावी. त्याचबरोबर प्रसिद्ध झालेले निविदा योग्य ठेकेदाराने काम केले आहे काय ? ठेकेदाराचे बिल अदा केले आहेत का ? ज्या वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध झाली त्याची बिले का दिले गेली नाहीत ? या मुद्द्यानुसार चौकशी करावी. अशी मागणी प्रसार माध्यम संपादक पत्रकार परिषदेच्या वतीने गोरख तावरे यांनी केलेली आहे.
शासनमान्य जाहिरात यादीवरील अनेक वृत्तपत्रांनी जिल्हा माहिती कार्यालय (सातारा) व उपसंचालक (पुणे) यांना पत्र देऊन टेंभू उपसा सिंचन यांत्रिक व विद्युत पथक ओगलेवाडी – कराड या कार्यालयाच्या जाहिराती आम्हास देऊ नयेत. आम्ही त्या प्रसिद्ध करणार नाही. असे लेखी पत्र दिलेली आहेत.