दैनिक स्थैर्य | दि. २३ ऑक्टोबर २०२१ | सातारा | सदरबाझार येथील समाज कल्याण ऑफिससमोरील पुलावर एका अज्ञात व्यक्तीने बेशुद्ध होण्याचे सोंग घेत दुचाकीवरून येणाऱ्या फिर्यादीला पकडले. त्यानंतर त्याने आपल्या साथीदाराच्या मदतीने फिर्यादीला बाजुला असणाऱ्या झाडीत नेवून शस्त्राचा धाक दाखवत लुटले.
याबाबत पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी, सदरबझार येथील समाज कल्याण ऑफिससमोरील पुलावर 20 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास एक अज्ञात व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडला होता. यावेळी फिर्यादी वनराज शिवाजीराव कुमकर (वय 55 रा. शनिवार पेठ) हे दुचाकीवरून सदरबझारच्या दिशेने निघाले होते. त्यांना अज्ञात व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसला. त्यांनी दुचाकीचा वेग कमी केला. त्यावेळी हा व्यक्ती उठला आणि त्याने व त्याच्या एका साथीदाराने वनराज कुमकर यांना पकडले. तसेच बाजुला असणाऱ्या झाडीत नेऊन धारदार शस्त्र मानेला लावून त्याच्या जवळील 10 हजार 520 रूपये किंमतीचा मोबाईल, रोख रक्कम, चार पेन ड्राईव्ह असे साहित्य चोरून पलायन केले. या गुह्याचा अधिक तपास महिला पोलीस निरीक्षक श्रीसुंदर करत आहेत.