दैनिक स्थैर्य | दि. १४ नोव्हेंबर २०२४ | पिंपोडे | ‘‘उत्तर कोरेगावमधील दुष्काळी परिस्थीती हटवणार्या वसना सिंचन योजनेचे श्रेय आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचेच आहे. 2015 – 16 च्या काळात ते सभापती असताना त्यांनी या योजनेला निधी मिळवून दिला. आत्ताचे 0.52 टी.एम.सी. पाणीही कुणा एकट्यामुळे आले नसून पाण्याचा फेरआढावा होत असतो त्यातून ते मिळालेले आहे शिवाय प्रशासकीय पातळीवर त्यासाठी श्रीमंत रामराजे यांनीही प्रयत्न केले आहेत. या भागातील स्वयंघोषित नेते आपण या कामासाठी डायरेक्ट निधी आणल्याचे सांगत आहेत, पण यात कुणाचा काहीही संबंध नाही. अशा लोकांना आपण बाजूला ठेवा’’, असा घणाघात आमदार दीपक चव्हाण यांनी पिंपोडे (ता.कोरेगाव) येथील जाहीर सभेत केला.
या सभेस खासदार डॉ. अमोल कोल्हे, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
उत्तर कोरेगावमधील प्रश्न सोडवण्यासाठी मी 15 वर्षे प्रामाणिक प्रयत्न केले
आमदार चव्हाण पुढे म्हणाले, ‘‘थांबलेली कामे करुन घेण्यासाठी आपण सत्तेत गेलो. पण सत्तेत जावूनही गुंडगिरी, दहशत याचा सामना आपल्याला करावा लागला. देशात, राज्यात गाजणारी ‘इडी’ फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागापर्यंत पोहचली. 30 वर्षात रामराजेंनी काय केलं असा सवाल करणार्या माजी खासदारांनी गावागावात हायमास्ट दिवा लावण्याशिवाय दुसरा कोणताही विकास केला नाही. उत्तर कोरेगावमधील प्रश्न सोडवण्यासाठी मी 15 वर्षे प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. वाठार स्टेशनमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत सुमारे 8 कोटीची योजना आणली, गावोगावी रस्ते, सांडपाणी व्यवस्था, अंगणवाडी आदी मुलभूत सुविधा देण्याची कामे आपण केली आहे. वसना नदी पुनरुज्जीवन अंतर्गत सोळशी ते देऊर 27 बंधार्यांची कामे आपण केली. हा भाग पावसावर अवलंबून असल्याने या बंधार्यांच्या कामामुळे शेतकर्याला लाभ झाला आहे.’’
विरोधी उमेदवाराने निवडणूकीनंतर आपले सातबारे त्यांनी तपासावेत आणि उत्तमपणे आपला व्यवसाय करावा
‘‘उत्तर कोरेगांवमधल्या कुठल्याही गावामध्ये आपण भेदभाव केला नाही. मागणीप्रमाणे निधी मंजूर केला. 15 वर्षात मी काय काम केलं हे सर्वांच्या समोर आहे. लोकप्रतिनिधीने करावयाची अपेक्षित सर्व कामे आपण केली आहेत. समोरच्या उमेदवाराची आर्थिक स्थिती उत्तम आहे. त्यांनी भविष्यात ती उत्तम ठेवावी. ते राजकारणात नवीन असल्याने त्यांच्यावर टिका करण्यासारखे काही नाही. पण मागचे अनुभव पाहता निवडणूकीनंतर आपले सातबारे त्यांनी तपासावेत आणि उत्तमपणे आपला व्यवसाय करावा. या भानगडीत पडू नये’’, असा उपरोधिक सल्लाही आ.चव्हाण यांनी विरोधी उमेदवार सचिन पाटील यांचे नाव न घेता दिला.