
दैनिक स्थैर्य | दि. २ ऑगस्ट २०२४ | सातारा |
कास पठारावर गेलेली एक स्कॉर्पिओ गाडी यवतेश्वर घाटातील गणेश खिंडीतून ५०० फूट दरीत कोसळली. या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले असून दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त कोरेगाव तालुक्यातील चिमणगावचे रहिवासी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सातारा शहराच्या पश्चिम भागात असलेल्या कास पठाराकडे जाणार्या रस्त्यावर असलेल्या गणेश खिंडीत हा अपघात झाला. यामध्ये स्कॉर्पिओ गाडी थेट ५०० फूट खोल दरीत कोसळली आहे. गुरुवारी सायंकाळी ५ च्या सुमारास ही घटना घडली. या स्कॉर्पिओ गाडीत ७ जणांचा समावेश होता. त्यापैकी २ जागीच ठार झाले आहेत. तर २ जण गंभीर जखमी झाले आहेत.
दरम्यान, अपघात झाल्या झाल्या या घाटावर मोठी गर्दी झाली. लोकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांसह शिवेंद्रराजे ट्रेकर्सचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या मदतीने जखमींना बाहेर काढण्यात आले आहे. दरम्यान, चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे.