महाराष्ट्राच्या अस्मितेची व्याप्ती जगाच्या सुख-दुःखाशी एकरूप होणारी : ज्येष्ठ विचारवंत डॉ.सदानंद मोरे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, नवी दिल्ली, दि. ०३ : महाराष्ट्राच्या अस्मितेची व्याप्ती ही जगाच्या सुख-दुःखाशी एकरूप आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, लेखक आणि तत्वज्ञानाचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी केले.

नवी दिल्ली येथील महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत डॉ सदानंद मोरे हे “महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रवास” या विषयावर ४० वे पुष्प गुंफताना बोलत होते.

यावेळी डॉ. मोरे म्हणाले, मराठीपणाचा विस्तार हा नेहमीच वैश्विक राहिला आहे. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत जे पसायदान मागितले आहे ते वैश्विक देवाकडे मागितले आहे. १३ व्या शतकातही मराठी लोकांच्या दैवतांची कल्पना सुद्धा वैश्विक होती म्हणून “पसायदान” हे पहिले विश्व गीत ठरते.

प्रत्येक प्रांताला स्वतःची अस्मिता…
प्रत्येक प्रांताला स्वतःची अस्मिता आणि ओळख असते असे नमूद करून डॉ. मोरे म्हणाले, प्रसिद्ध इतिहासकार यदुनाथ सरकार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रात म्हटले आहे की, संपूर्ण देशात महाराष्ट्राची बरोबरी कोणी करू शकेल असे वाटत नाही आणखी १०० वर्षांनी महाराष्ट्र जगात अग्रेसर राहील, या यदुनाथ सरकार यांच्या विधानावर आपण खरे उतरलो आहोत का ? याचा विचार मराठी माणसाने केला पाहिजे.

महाराष्ट्राच्या अस्मितेबद्दल न्या.रानडे, विठ्ठल रामजी शिंदे, वि. का. राजवाडे तसेच इरावती कर्वे आदींनी लेखन केले आहे,असे नमूद करून डॉ. मोरे पुढे म्हणाले, कुठल्याही समुहाच्या अस्मितेचा आधार ही त्याची भाषा असते आणि ही मराठी भाषा आपण बोलायला लागलो ते १३ व्या शतकात. त्यावेळी चक्रधर स्वामींचे लिळा चरित्र हा चरित्रग्रंथ निर्माण झाला. ज्ञानेश्वरी सुद्धा या काळात लिहिली गेली. चक्रधर स्वामींचे आदेश होते की आपण मराठी बोलली पाहिजे.

यादव काळात राज्य कारभार मराठीत
देवगिरीचा राजा रामदेवराय यादव यांच्या काळात सर्व कारभार मराठी भाषेत चालत असे, त्याच्या दरबारात मराठी कविता वाचनाचे उपक्रम राबविले जात असत, न्यायदान सुद्धा मराठी भाषेत होत असे आणि मराठी शिलालेख सुद्धा या काळात लिहिले गेले. “हल” या सातवहन राजाने ७०० उत्तम कवितांची गाथा तयार केली होती. जैन धर्मीयांनी महाराष्ट्रीय प्राकृत भाषेत आपले ग्रंथ लिहिले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी राजभाषा कोश तयार केला
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात मराठी भाषेची पुनर्स्थापना झाली असे सांगून डॉ मोरे म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वभाषा, स्वधर्म आणि स्वराज्य या तीन संकल्पना पुढे आल्या आणि याची पुनरावृत्ती होणे आवश्यक आहे. महाराष्ट्रीय माणूस नेहमीच देशाचा विचार करतो, मराठी माणसाची अस्मिता संकुचित नाही तर ती व्यापक स्वरूपाची आहे असेही डॉ मोरे यावेळी म्हणाले.


Back to top button
Don`t copy text!