मुंबईच्या चाळीपेक्षा शाळेतील कॉरंटाईन परवडले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, खटाव, दि. 18 : कडक लॉकडाऊनच्या काळात मुंबईतील चाळीत अक्षरश: लोकांचा कोंडमारा झाला होता. चाळीत राहण्यापेक्षा गावी येवून शाळेत कॉरंटाईन झालेल्या गुरसाळे (ता. खटाव) येथील एका कुटुंबाला गावाकडचे आगळे समाधान लाभले.

याबाबतची अधिक माहिती अशी, गुरसाळे येथील आलम मौला शिकलगार हे कुर्ला (मुंबई) येथे वास्तव्यास आहेत. त्या ठिकाणी ते स्वत:चा व्यवसाय सांभाळत कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असतात. त्यांच्या कुटुंबामध्ये पत्नी मिनाज, मुलगी तमन्ना व मुलगा रेहान असा परिवार आहे. सद्या त्यांच्या बिल्डींगचे काम चालू असलेमुळे त्यांना चाळीमध्ये रहावे लागत होते. चाळीतील लहान खोली त्यातच ऐन उन्हाळ्यात लॉकडाऊन पडले. उद्योग नाही, घराबाहेर पडता येत नाही. अश्या परस्थितीत पती, पत्नीसह शाळा शिकणार्या मुलांचाही मोठा कोंडमारा झाला होता. दोन महिने अडचणीच्या परस्थितीत काढल्यानंतर मागील पंधरवडय़ात सरकारने लॉकडाऊनमध्ये काहीअंशी सुट दिली. त्यामुळे मुंबई, पुण्यासह इतर शहरात अडकलेल्या लोकांना गावी येण्याचा मार्ग सुकर झाला. शिकलगार कुटुंबियांनीही तातडीने सर्व प्रकारची प्रक्रिया पुर्ण करुन गावी येण्याचा निर्णय घेतला.

ते गावी येणार असे समजल्यानंतर त्यांना शाळेमध्ये कॉरंटाईन करण्यात येणार होते. ही माहिती मिळाल्यानंतर शिकलगार यांच्या कुटुंबियांनी ते येण्यापूर्वीच गॅस सिलेंडर तसेच इतर घरगुती, जीवनावश्यक वस्तु शाळेमध्ये पोहोच करुन ठेवल्या. आल्यानंतर दुध, पिण्याचे पाणी व इतर साहित्यही खोलीबाहेर ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली. ज्या ठिकाणी कॉरंटाईन करण्यात आले आहे. त्या सोमेश्वर विद्यालयाच्या प्रांगणात पाण्याचीही चांगली सुविधा आहे. त्यामुळे अंघोळ, धुणे धुण्यासाठी मुबलक पाणी मिळत आहे. शेजारच्या खोल्यांमध्येही चार, दोन कुटुंबे आहेत. त्यांच्याशी लांबून का होईन जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करता आले. सद्या भरपूर वेळ असल्याने दोन्ही मुले अभ्यासाबरोबर खेळाचा आनंद घेत आहेत. तर स्वत: आलमभाई राहत्या खोलीतच चारवेळा नमाज पठण करत आहेत. बारा दिवसांचा कालावधी कसा गेला हे कळले सुध्दा नसल्याचे आनंदाने शिकलगार कुटुंबियांनी सांगितले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!