राज्यातील शाळांची घंटा यंदा 16 जूनला वाजणार

शिक्षण संचालक शरद गोसावी यांचा आदेश


दैनिक स्थैर्य । 13 मे 2025। सातारा । राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना शुक्रवार (ता. दोन) पासून उन्हाळी सुटी लागली असून, 16 जूनला नवीन शैक्षणिक वर्ष 2025-26 सुरू होणार आहे. शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी तसे आदेश नुकतेच निर्गमित केले आहेत.

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील वार्षिक निकालाचे कामकाज पूर्ण झाले आहे. एक मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा करून विद्यार्थ्यांना त्यांचा वार्षिक निकाल जाहीर करण्यात येतो. मात्र, उन्हाळी सुटीनंतर जूनमध्ये शाळाविद्यालये केव्हा भरणार, ती तारीख निकालपत्रकावर नमूद करावी लागते. त्यासाठी शिक्षण विभागाशी वारंवार संवाद साधूनही तारीख जाहीर होत नव्हती. त्यामुळे उन्हाळी सुटीबाबत चर्चांना उधाण आले होते. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवरउन्हाळी सुटी कमी होणार, शाळा एक जूनपासून सुरू होणार का, सुटी कधी सुरू होणार? याबाबत विद्यार्थी पालक व शिक्षकांमध्ये अस्वस्थता होती.

शिक्षक, मुख्याध्यापक संघटनांकडून शिक्षणाधिकार्‍यांकडे त्याबाबत विचारणा केली जात होती.मात्र, संचालक कार्यालयाकडून स्पष्ट सूचना नसल्याने तेही काही सांगत नव्हते. शिक्षण संचालक शरद गोसावी यांच्या आजच्या पत्राने सर्वांना हायसे वाटले. संपूर्ण राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुटीच्या जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुटीनंतर तेथील राज्य मंडळाच्या शाळा सोमवार, 23 जून ते 28 जून 2025 पर्यंत सकाळ सत्रात (सात ते पावणेबारा) या वेळेत सुरू करण्यात याव्यात. सोमवार 30 जूनपासून नियमित वेळेत सुरू करण्यात याव्यात, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. सुटीचा कालावधी व जूनमध्ये शाळा भरण्याची तारीख निश्चित झाल्यामुळे विद्यार्थी पालक व शिक्षकातील अस्वस्थता दूर होणार आहे. सुटीतील नियोजन करणे सुलभ होणार आहे.

कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी त्यांनी आज सूचना निर्गमित केल्या. त्यानुसार, सन 2025 ची उन्हाळी सुटी दोन मेपासून जाहीर करण्यात आली, तसेच पुढील शैक्षणिक वर्ष सन 2025- 26 मध्ये विदर्भ वगळता इतर सर्व विभागांतील राज्य मंडळाच्या शाळा सोमवार, ता. 16 जून 2025 लासुरू करण्यात याव्यात. राज्यातील इतर मंडळाच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास विद्यार्थ्यांना सुटी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर उचित निर्णय घ्यावा, असेही पत्रात नमूद केले आहे

मुलांच्या सुटीचा कालावधी व पुन्हा शाळा कधी भरणार आहे, याबाबत शाळाही माहिती देत नव्हत्या. त्यामुळे सुटीतील नियोजन अद्याप केले नव्हते.
– संतोष देशमुख, पालक, वडूज.


Back to top button
Don`t copy text!