
स्थैर्य, सातारा, दि. 5 एप्रिल, प्रसन्न रुद्रभटे : राजकारणात एखादा चित्रपट हिट होतो तशी विजयाची मालिका जेव्हा लागते, तेव्हा त्या चित्रपटाच्या ‘दिग्दर्शकाची’ (Director) चर्चा सर्वात जास्त होते. सातारा जिल्हा परिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापती पदाच्या पार पडलेल्या बिनविरोध निवडणुकांनंतर जिल्ह्याच्या राजकारणात एकाच ‘मास्टरमाईंड’ची जोरदार चर्चा आहे, ते म्हणजे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर! बॉलीवूडचा सुप्रसिद्ध डायलॉग आहे, “हार कर जीतने वाले को बाजीगर कहते है!” फलटणपासून साताऱ्यापर्यंत सत्तेचा जो नवा सारीपाट दादांनी मांडला आहे, तो पाहून सारेच जण त्यांना जिल्ह्याच्या राजकारणातले खऱ्या अर्थाने ‘बाजीगर’ मानू लागले आहेत.
फ्लॅशबॅक: विजयाची ‘मल्टीस्टारर’ मालिका!
कोणत्याही सुपरहीट चित्रपटात जसा एक दमदार ‘फ्लॅशबॅक’ असतो, तसाच दादांचा गेल्या काही महिन्यांतील राजकीय प्रवास आहे. “नाम तो सुना ही होगा..!” या स्टाईलने त्यांनी एकापाठोपाठ एक विजयाचे विक्रम रचले. सुरुवातीला फलटण नगरपालिकेत लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या रूपाने मिळवलेली सत्ता, त्यानंतर फलटण पंचायत समितीच्या सभापतीपदी कु. शिवांजली भोसले यांची बिनविरोध निवड करून फडकवलेला झेंडा, नुकतीच झालेली सातारा जिल्हा परिषदेची ऐतिहासिक अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड आणि आज विषय समित्यांवर मिळवलेले निर्विवाद वर्चस्व! हा सत्तेचा ‘मल्टीस्टारर’ चित्रपट रणजितदादांच्या अत्यंत अचूक नियोजनानेच ‘सुपरहीट’ झाला आहे.
“आता कसं… दादा म्हणतील तसं!” – मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचा मोठा विश्वास
हा डायलॉग राजकारणात खऱ्या अर्थाने कसा प्रत्यक्षात येतो, हे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अत्यंत मोकळ्या वक्तव्यातून दिसून आले. विषय समित्यांच्या बिनविरोध निवडीनंतर बोलताना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी रणजितदादांचे भरभरून कौतुक केले.
ते म्हणाले, “मी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे सर्वात जास्त आभार मानेन. निवडणुकीत सगळ्या गोड बातम्या आम्हाला त्यांच्याकडूनच मिळत होत्या. पुढे काय-काय घडत जाणार आहे, हे दादा आम्हाला अचूक सांगत होते. आता यापुढे मी आणि मंत्री जयकुमार गोरे यांनी ठरवले आहे की, पुढच्या सर्व जबाबदाऱ्या या रणजितदादांकडेच द्यायच्या आहेत. आम्ही दोघेही दादांच्या नेतृत्वात गेलो आहोत. आता कसं… दादा म्हणतील तसं!” एका कॅबिनेट मंत्र्याने असा जाहीर आणि दिलखुलास विश्वास व्यक्त करणे, हा दादांच्या संयमी नेतृत्वाचा सर्वात मोठा सन्मान मानला जात आहे.
“एक बार जो कमिटमेंट कर दी…” – मंत्री जयकुमार गोरेंकडून ‘प्लानिंग’ला दाद
एखादी जबाबदारी हातात घेतली की ती पूर्ण कशी करायची, याचे उत्तम उदाहरण म्हणजे रणजितदादा. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दादांच्या याच ‘परफेक्ट एक्झिक्युशन’चे विशेष कौतुक केले.
मंत्री गोरे म्हणाले, “जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि आता सभापती पदाच्या निवडणुकीत माजी खासदार रणजितसिंहांनी जी दमदार कामगिरी केली आहे, त्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक करावे लागेल. त्यांनी या संपूर्ण प्रक्रियेत अत्यंत बारकाईने आणि सातत्याने लक्ष दिले. विजयासाठी ज्या-ज्या गोष्टी करणे आवश्यक होते, त्या सर्व गोष्टी त्यांनी लीलया पार पाडल्या.”
पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त!
थोडक्यात सांगायचे तर, फलटण नगरपालिकेपासून सुरू झालेली विकासाची आणि विजयाची ही ‘एक्सप्रेस’ आता सातारा जिल्हा परिषदेच्या स्टेशनवर अत्यंत दिमाखात पोहोचली आहे. समन्वय आणि अचूक रणनीती या त्रिसूत्रीवर रणजितदादांनी सर्वांची मने जिंकली आहेत. साताऱ्याच्या राजकारणाचा आणि विकासाचा हा ‘ब्लॉकबस्टर’ चित्रपट असाच पुढे चालत राहील. शेवटी इतकेच म्हणता येईल की, सातारा जिल्ह्याच्या या नव्या विकासाच्या प्रवासात “पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त!”
