सातारा नगरपालिकेला लवकरच हद्दवाढ क्षेत्राचा निधी प्राप्त होईल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि.०२:  नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांना नगरपरिषदेने हद्दवाढ क्षेत्राचा 51 कोटी रुपयांचा विकास आराखडा सादर केला असून, याबाबत आम्ही मंत्र्यांशी सविस्तर चर्चा केली आहे. ना. एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या अभिवचनाप्रमाणे लवकरच सातारा नगरपरिषदेकडे याकामी निधी प्राप्त होईल,’ अशी माहिती खा. उदयनराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
सातारा नगरपरिषदेच्या विविध प्रश्‍नांवर नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांची खा. उदयनराजे भोसले यांनी भेट घेऊन हद्दवाढ क्षेत्राचा विकास आराखडा, नावीन्यपूर्ण योजनेतून नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी निधी, कासची उंची वाढवण्याच्या कामाला निधी तसेच कासच्या बंदिस्त पाईपलाईनकरिता निधी, कर माफीबाबत राज्य शासनाची मान्यता, नवीन विद्युत दाहिनी आदी मुद्द्यांवर चर्चा केली.
खा. उदयनराजे यांनी पत्रकात म्हटले आहे की, नगरपरिषदेच्या सुमारे 40 ते 50 वर्षामध्ये पहिल्यांदाच सप्टेंबर 2020 मध्ये हद्दवाढ झाली आहे. हद्दवाढ क्षेत्रातील खेड, गोडोली, विलासपूर, शाहूपुरी, करंजे, दरे खुर्द, कोडोलीचा काही भाग, शाहूनगरमधील आणि गोडोलीचा त्रिशंकू भाग येथील सुमारे 160 किमी लांबीचे रस्ते, 17 किमी लांबीची गटर्स/पाईपड्रेन, पोलसह सुमारे 100 स्ट्रीट लाईटस, याकरीता तसेच या परिसरातील ओपन स्पेसचा विकास, फाशीचा वड, चारभिंती, अजिंक्यतारा परिसर, तलाव आदी ठिकाणी नवीन बागा, ओपन जीम, ठिकठिकाणी वृक्षारोपण आदी अनेक विकासकामांचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. सदर 51 कोटी 41 लाख रुपयांचा आराखडा राज्याचे नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांना नगरपरिषदेच्या वतीने सादर करण्यात आला.
नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीकरीता 1 रुपयामध्ये पद्मश्री बाबासाहेब कल्याणी यांचेकडून नगरपरिषदेने सुमारे 40 गुंठे जागा खरेदी केलेली आहे. सदर जागेवर प्रशासकीय इमारत उभारण्यात येणार आहे. त्याकरिता राज्यशासनाने वैशिष्यपूर्ण, नावीन्यपूर्ण योजनेमधून सातारा नगरपरिषदेला भरीव निधी प्रदान करावा, अशी आग्रही मागणीही यावेळी ना. शिंदे यांच्याकडे करण्यात आली. यावर ना. एकनाथ शिंदे यांनी याच महिन्याच्या अखेरीस प्रशासकीय इमारतीसाठी निधीचा पहिला टप्पा मंजूर करुन वितरीत केला जाईल, असे सांगितले. त्यामुळे प्रशासकीय इमारतीचे बांधकामास यावर्षी सुरुवात  करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
माहुली येथे कोरोना काळात अंत्यसंस्कार होण्यास वेळ लागत होता, त्यासाठी याठिकाणी विद्युत दाहिनी बसवण्याकामीचा प्रस्ताव ना. एकनाथ शिंदे यांना प्रस्ताव दिला असता, त्यास ना. एकनाथ शिंदे यांनी तातडीने मंजुरी दिली आहे. त्यामुळे लवकरच याठिकाणी विद्युत दाहिनी बसवली जाणार आहे. राजवाडा येथील जुन्या नगरपालिका कार्यालयामध्ये आर्ट गॅलरीचे प्रस्तावास ना. एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे.
सातारा शहराची हद्यवाढ झाल्याने उपलब्ध कर्मचारी यांच्यामार्फत नागरी सुविधा पुरवणे अशक्य होत असल्याने, सातारा नगरपरिषदेमध्ये नवीन पदनिर्मिती करून, जागा भरण्याच्या प्रस्तावासही ना. एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे..

Back to top button
Don`t copy text!