दैनिक स्थैर्य । दि. १६ मार्च २०२२ । मुंबई । राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेले सफाई कर्मचारी, रूग्णवाहिकेचे वाहनचालक यांचे थकीत वेतन तत्काळ अदा करण्यात येणार आहे. भविष्यात वेतन थकणार नाही यासाठी धोरणात्मक निर्णय घेणार असून कोकणातही सुपर स्पेशालिटी रूग्णालय सुरू करण्यासाठी शासन सकारात्मक कार्यवाही करेल, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
विधानसभेत सदस्य राजन साळवी यांनी रत्नागिरी येथील राजापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रूग्णवाहिका चालकांच्या मानधनासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. हरिभाऊ बागडे, बाळासाहेब देशमुख, प्रकाश आबिटकर, कैलास पाटील, महेश लांडगे यांनी यावेळी उपप्रश्न विचारले. राज्यात दोन सुपर स्पेशालिटी रुग्णालय असून, त्या अनुषंगाने कोकणातही सुपर स्पेशालिटी रूग्णालय उभारण्यात येणार आहे. अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार ३६ कोटीचे वितरण तत्काळ करण्यात येणार आहे. त्यातून प्राथमिक आरोग्य केंद्रातील रूग्णवाहिकेवरील कंत्राटी वाहनचालक तसेच सफाई कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन तात्काळ अदा करण्यात येणार आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन नियमानुसार वेतन दिले जात नसेल, तर संबंधित कंत्राटदार संस्थेवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही आरोग्यमंत्री श्री.टोपे यांनी सांगितले.
शववाहिका आणि रूग्णवाहिकेच्या डिझेलचा खर्चही शासन देणार असून जननी शिशुंसाठी असलेली 102 क्रमांकाची रूग्णवाहिका सर्व ग्रामीण आणि प्राथमिक आरोग्य केंद्राला देण्यात येणार आहे. अपघातासाठी 108 क्रमांकाच्या जुन्या एक हजार रूग्णवाहिका बदलण्यात येत असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी एका उपप्रश्नाच्या उत्तरात सांगितले.