
‘हिंद दी चादर’ कार्यक्रमात बोलताना सुनेत्राताई पवार
स्थैर्य, 3 मार्च, मुंबई : ‘हिंद दी चादर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांनी धर्मस्वातंत्र्य आणि मानवाधिकारांच्या रक्षणासाठी दिलेले बलिदान आजच्या काळातही प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या की, सतराव्या शतकात अन्यायाविरुद्ध निर्भयपणे उभे राहून श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांनी भारताच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक अस्मितेचे रक्षण केले. त्यांच्या त्यागाचे स्मरण करणे आणि त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे, हीच या समागम कार्यक्रमाची खरी प्रेरणा आहे. गुरु नानक देव यांना वंदन करत श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या शिकवणीचा उल्लेख केला. प्रार्थना, परोपकार, सेवा, साधेपणा आणि निर्भयता यांचा संदेश श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांनी दिला. त्यांच्या वचनांचा समावेश गुरु ग्रंथ साहिबमध्ये असून, त्यांच्या बलिदानामुळे सिख धर्मातील शौर्य आणि त्यागाची परंपरा अधिक बळकट झाली.
“कुणालाही घाबरवू नका आणि कुणालाही घाबरू नका” हा संदेश आजच्या धावपळीच्या जीवनात अधिकच महत्त्वाचा ठरतो, असे नमूद करत समाजात प्रेम, एकता आणि बंधुभाव जोपासण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले. हा ३५० वा शहिदी समागम कार्यक्रम सर्व भाविकांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त त्यांनी व्यक्त केला.

