मार्गशीर्ष मासातील प्रत्येक दिवस मंजे देवाला जागं करणं नव्हे. तर माणसाला जागं करण्याचा पर्व काळ होय. आज खरी गरज आहे ती प्रबोधनाची. तिची पूर्तता करण्याची उत्तम वेळ होय.
आज माणसा माणसा मध्ये संवाद हरवत चालला आहे. संशयाचे धुके गडद होत आहे. अचनाक धक्का देणाऱ्या अवकाळी सरी कोसळत आहेत. मन गोठवून टाकणा-या गारांचा पावूस सुरु आहे. मना मनात अशांतता नांदत आहे. रुढी परंपरा चालीरिती यांचे आधुनिक स्वरुपात पेव फुटले आहे. नैतिकता बस्तान गुंडाळून बसली आहे. सत्य झाकले जात असून लबाडीचा आवाज जोरात आहे. ख-याला तरास अन् खोट्याला सिंहासन अशीच अवस्था दिसून येत आहे. नात्या नात्यांत गुंतागुंत वाढली आहे. भौतिक साधनाच्या रेलचेलीत जगणं गुदमारतंय. जातीयतेच दळण भरडले जात आहे. धर्माचे अनुयायी बेधुंदपणे वावरताना दिसत आहे. अत्याचाराने किळस आणली आहे. प्रसार माध्यामांचा नंगानाच सुरु आहे. महागाईचा डोंब उसळला आहे. प्रदुषणाला निरोगी वातावरण भेटतंय. वागणं , बोलणं ,चालणं बेताल झालं आहे. अशा सा-या बिकट वहिवाटीतून माणसाला बाहेर काढण्यासाठी प्रबोधन आवश्यक आहे.
नुसतं जागं न करता जागृत करणारा मार्गशीर्ष जणू आपणाला हेच सांगतो आहे की, हे भल्या माणसा ऊठ जागा हो. तुझं कर्म कर. मेहनत प्रामाणिकपणे करुन कष्टाचं खा. लोभाच्या भानगडीत तू नक्कीच अडचणीत येशील. अपत्य संगोपन ,संस्कार , शिक्षण उत्तम दे. त्यांना परावलंबी बनवू नको. रुपायात आण्याची भर घालण्यास शिकव. कुटुंब , नातीगोती , मित्र परिवार यांच्याशी सदैव नम्रपणे वागावे. दीन , दुबळे , वंचित , पिडीत यांची सेवा हाच भगवंताचा मेवा आहे. खरंच येळ गेली नाही. तवरच जागा होऊन. उभा रहा. चालत असल्यास गती घेऊन इच्छित स्थळी पोहचण्याचा हाच राजमार्ग आहे. हे सारं सांगणारा पवित्र मास मार्गशीर्ष देवाला नव्हे तर आपणाला सताड जागं करणारा आहे. हे लक्ष्यात ठेवणं.
आरामात राम नव्हे तर कार्यात राम आहे. तो भेटण्यासाठी कुठंही न जाता आपल्या मनाशी प्रामाणिकपणे राहिल्यास तो धावतच येणार . यात तिळमात्र शंका नाही. उगाचच दुसऱ्याची नुसती धुणी धुवण्यापरीस आपलंच मन वरचेवर धुवून काढल्यास कोणतीच बाधा होणार नाही. शांती करुन शांतता भेटलं यावर विश्वास ठेऊच नका. त्यापरीस शांत राहून सत्कर्म करा. आपलं आयुष्य सफलाच झालं म्हणून समजावे.
आपण प्रत्येकांने जमलं तसं प्रबोधन करावं. सकारात्मकतेची कास धरावी. देवाच्या नामस्मरणा बरोबरच रोजी रोटीची सोय करावी. सांगता आले तर योग्यच सांगावे. मार्गशीर्ष व्रत सोप आहे. आचरण महत्त्वाचे आहे.संगत योग्य असावी. नितीनेमाच पालन करावं. कुळाला शोभेल असं वर्तन असावं. वागणं ,बोलणं ,चालणं लयीत असावं. फारच प्रबोधन होतंय असं मला वाटतं. स्वलपविराम घेऊ या….
आपलाच शब्द वाहक – प्रा. रवींद्र कोकरे – ग्रामीण कथाकार,
श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण.
९४२१२१६८२१