स्थैर्य, खंडाळा, दि. 27 : खंडाळा तालुक्यातील सुखेड व बोरी या दोन गावांमधील प्रत्येकी 5 महिलांनी वेगवेगळ्या वेळी येऊन बोरीच्या बाराची परंपरा शिव्या न देता खण व नारळाने ओटी भरून, पूजा करून पारंपरिक पद्धतीने प्रतीकात्मकरित्या साजरा करुन कायम ठेवली.
यावर्षी कोरोना संसर्गजन्य रोगामुळे बोरीचा बार रद्द करण्याचा निर्णय दोन्ही गावांनी घेतला असला तरी ही प्रथा बंद होऊन गावात काही अनिष्ट घडून नुकसान होऊ नये म्हणून महिलांनी बोरीचा बार खंडित होणार नाही याची दक्षता घेतली. बाराच्या वेळी ना बघे होते, ना पोलीस होते, ना डफडे होते, ना ताशा होता पण बोरीचा बार पार पडलाच. बोरीचा बार प्रथा सुरु राहिल्याचे समाधान या महिलांच्यात दिसत होते तर बार न भरल्याची खंतही व्यक्त केली. लोणंद व खंडाळा या दोन्ही गावापासून सुमारे 7 किलोमीटर अंतरावर डोंगर कुशीत असणार्या सुखेड व बोरी गावाच्या दरम्यान जाणार्या ओढ्याच्या पात्रात दोन्ही गावच्या महिला दोन्ही बाजूच्या काठावर उभ्या राहून, हातवारे करून एकमेकींना शिव्यांची लाखोली वाहत बोरीचा बार गेली अनेक वर्षे घालत आल्या आहेत.
बोरीच्या बाराची प्रथा खंडित झाल्यास गावावर संकट येईल म्हणून गावातीलच माहेर व सासर असणार्या 5 महिलांनी बोरीचा बार प्रतीकात्मक पध्दतीने घालण्यासाठी सोशल डिस्टन्स व मास्क घालून दुपारी 12 च्या सुमारास प्रथम बोरी गावातील 5 महिला सनई, डफडे, तुतारीच्या निनादात या महिलांनी प्रथमता वारूळाची पूजा केली. त्यानंतर सुमारे अर्ध्या तासाने 12.30 च्या सुमारास सुखेड गावातील 5 महिला येऊन त्यांनीही हळदी-कुंकू वाहून व श्रीफळ वाढवून पूजा केली. तेथील माती घेऊन ओढ्यात जाऊन सतीआईची खण, नारळाने ओटी भरून पूजा केली. काही महिलांनी हातवारे करत पण शिव्या न देता बार घातला. यावेळी दोन्ही गावातील महिलांनी गावावर कोणतेही संकट येऊ, महिलांचे रक्षण व्हावे, महिला आजारी पडू नयेत म्हणून बार घालण्याची परंपरा सुरु ठेवली असल्याचे सांगितले.
सकाळपासूनच बोरी व सुखेड गावात तशी शांतताच होती. बोरीचा बार भरणार नसल्याने अनेक महिलाही दैनंदिन कामात व्यस्त होत्या. त्यामुळे आज बार भरणार नसल्याचे दिसून येत होते. पण प्रतीकात्मक पद्धतीने बोरीचा बार साजरा करण्याची तयारी दोन्ही गावात सुरू होती. त्यानुसार बोरीचा बार अखेर पार पडला. कोणतीही शिवी न देता, शिव्यांची लाखोली न वाहता केवळ गावावर कोणतेही संकट येऊ नये यासाठी बार भरलाच.
आतापर्यंत बर्याच वेळा बोरीचा बार ही अनिष्ट प्रथा बंद करण्याचा प्रयत्न झाला होता पण त्यात यश आले नव्हते. आतापर्यंत कोणालाही जमले नाही त्याचप्रमाणे यावेळीही करोनाने बार भरणार नाही, असे सांगितले जात होते.