दैनिक स्थैर्य । दि.२० नोव्हेंबर २०२१ । सातारा । सातारा विकास आघाडीच्या बोटचेपी धोरणामुळे डॉ नरेंद्र दाभोलकर पुरस्काराचे वितरण होवू शकलेले नाही. ‘साविआ’कडून पुरस्कार देण्यासाठी चालढकल केली आहे. त्यामुळेच पुरस्कार रखडला आहे, अशी घणाघाती टीका नगरविकास आघाडीचे पक्षप्रतोद अमोल मोहिते यांनी केली.
अमोल मोहिते यांनी पत्रकात म्हंटले आहे की, डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती सामाजिक पुरस्कार देण्याचा विषय मी स्वत: पुढाकार घेवून सातारा नगरपालिकेत मंजूर करुन घेतला होता. पहिल्या वर्षीपासून समाजातील मान्यवरांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सातारा विकास आघाडीची सत्ता आल्यानंतर हा पुरस्कार देण्यास चालढकल केल्याने त्यांच्या विरोधात तीन दिवस नगरपालिकेच्या दारात मी धरणे आंदोलनही केले होते. माझ्या आंदोलनाची दखल घेवून दोन वर्षानंतर ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांना पुरस्कार दिला होता. त्यानंतर पुन्हा सलग तीन वर्षे हा पुरस्कार दिलेला नाही. त्याकडे मी ‘साविआ’चे लक्ष वेधले होते. मात्र, टक्केवारीच्या आणि गटातटाच्या राजकारणात अडकलेल्या ‘साविआ’ला चांगले काम करण्यासाठी वेळच नाही. त्यांची काळीकुट्ट कारकिर्द संपायला अवघा एक महिना शिल्लक राहिला आहे. तरी चांगले निर्णय घेण्याची सुबुध्दी त्यांना मिळत नाही. सातारकरांनी त्यांचा कारभार पाच वर्षे उघड्या डोळयांनी बघितला आहे. सातारा विकास आघाडीला त्याची किंमत मोजायला लागणार आहे.
सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी पुरस्काराच्या वितरणासाठी आवाज उठवला याबद्दल त्यांचे आम्ही अभिनंदन करतो. त्यांनी निश्चितपणे आंदोलन करावे. त्यांच्या आंदोलनाला आमचा सक्रीय जाहीर पाठींबा असेल. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्याविषयी अतिव आदर असल्यानेच हा पुरस्कार सुरु करण्यात आला होता. मात्र, सातारा नगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांना त्याविषयी आदर वाटत नाही, अशीच त्यांची भूमिका आहे, असेही अमोल मोहिते यांनी म्हटले आहे.