
स्थैर्य, फलटण, दि. 22 डिसेंबर : जिल्हाभर ज्यांचा शब्द म्हणजे अंतिम आदेश मानला जायचा, ज्यांनी सलग ३५ वर्षे जिल्ह्याच्या राजकारणावर एकहाती हुकूमत गाजवली, त्या बलाढ्य नेतृत्वाला आज आपल्याच वारसदाराचा पराभव का पाहावा लागला? या प्रश्नाचे उत्तर विरोधकांच्या बलाढ्य ताकदीत तर आहेच, यासोबतच नेत्याच्याच बंगल्यावर तळ ठोकून असलेल्या ‘विशिष्ट वर्तुळात’ दडलेले आहे. निष्ठवंत कार्यकर्त्यांना बाजूला सारून, ज्या ‘चांडाळ चौकडी’ने नेत्याभोवती कडे केले होते, त्याच चौकडीने सत्तेचा बुरुज आतून पोखरल्याची चर्चा आता उघडपणे होऊ लागली आहे.
या पराभवाचे विश्लेषण करताना बंगल्यावरील ‘ते’ तीन-चार चेहरे आणि त्यांची कार्यपद्धती प्रामुख्याने कारणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे.
बंगल्यावरील सोशल मीडिया सरदार
या चौकडीतील एक प्रमुख चेहरा म्हणजे स्वतःला नेत्याचा ‘मानसपुत्र’ समजून वावरणारे महाशय. यांच्याकडे नेत्याच्या गटाची सोशल मीडियाची जबाबदारी असल्याचे बोलले जाते, पण यांचा वावर मात्र आपणच पुढचे वारसदार असल्याच्या आविर्भावात असतो. सर्वसामान्य कार्यकर्ता नेत्याला भेटायला आला, तर हे महाशय असे वागतात की जणू काही तेच निर्णय घेणार आहेत. सोशल मीडियावर नेत्याची प्रतिमा चमकवण्यापेक्षा स्वतःचाच बडेजाव करण्यात यांनी जास्त रस दाखवला आणि जमिनीवरच्या कार्यकर्त्याला दुखावले.
कळीचे नारद
सत्तेच्या पतनाला कारणीभूत ठरलेला दुसरा महत्त्वाचा चेहरा म्हणजे नेत्याचे जुने सहकारी असलेले गृहस्थ. यांचे काम नेत्याला मदत करणे असते, पण यांचे काम मात्र ‘आगीत तेल ओतण्याचे’ राहिले आहे. गटातीलच एक कार्यकर्ता भेटायला आला की, हा कसा आपल्यासोबत नाही, हे नेत्याला पटवून द्यायचे, हा यांचा आवडता छंद. साहेबांपर्यंत खरी माहिती पोहोचूच न देण्याची खबरदारी हे महाशय न चुकता घेत असत. त्यामुळे निष्ठावंतांची गळचेपी झाली आणि नाराजीचा स्फोट झाला व अनेक दिग्गज चेहरे गेटपासून लांब गेले.
गल्लीत शून्य, पण बंगल्यावर ‘हीरो’
या प्रमुख कलाकारांच्या सोबतीला अजून काही ‘हलगी वाजवणारे’ सहकलाकारही तिथे सक्रिय आहेत. गंमत म्हणजे, ज्यांना त्यांच्या स्वतःच्या गल्लीतही कोणी विचारत नाही, कुत्रंही ज्यांना भीक घालत नाही, अशी ही मंडळी केवळ नेत्याच्या नावाचा वापर करून स्वतःची पोळी भाजून घेत होती. स्वतःच्या फायद्यासाठी नेत्याची दिशाभूल करणाऱ्या या टोळक्याने नेत्याला वास्तवापासून तोडले.
थोडक्यात सांगायचे तर…
३५ वर्षांचे राजकारण, जेव्हा नेत्याचे कान आणि डोळे त्याचे दरबारी बनतात, तेव्हा गड ढासळायला वेळ लागत नाही. ‘आपल्याच माणसांनी केलेला घात’ आणि नेत्याचा यांच्यावर असणारा अतिविश्वास गेल्या २ वर्षांपासून नडला आहे. आता तरी हा ‘बंगला’ या चांडाळ चौकडीपासून मुक्त होणार का, की भविष्यातही हेच ‘कलाकार’ नवीन प्रयोग सादर करणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
