दैनिक स्थैर्य । दि. १७ एप्रिल २०२३ । पुणे । विधान सभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याविषयी वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. अजित पवार हे भाजपात जाणार अशी चर्चा जोर धरू लागली आहे. दादांसोबत राष्ट्रवादीचे काही आमदारही जाणार असल्याचे बोलले जाते. अलीकडील अजित पवारांची विधाने पाहिली असता दादा सरकारबद्दल कुठेही आक्रमक वक्तव्य करताना पाहायला मिळत नाही. त्यामुळे या चर्चांना उधाण आले आहे.
त्यात आता राष्ट्रवादी आमदारांनीही उघडपणे भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतही गट पडणार का? असे बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी येथील आमदार अण्णा बनसोडे यांनी अजित पवार जी भूमिका घेतील ती १०० टक्के मान्य आहे असं विधान केले आहे. बनसोडे म्हणाले की, मी मागील काळातही अजितदादांसोबत होतो. उद्या अजितदादा जी भूमिका घेतील मी त्यांच्यासोबत ठाम असणार आहे. मी दादांचा कट्टर समर्थक आहे. माझा अजितदादांवर विश्वास आहे. दादा जो निर्णय घेतील त्यांच्यासोबत मी राहणार आहे असं त्यांनी स्पष्ट सांगितले आहे.
अजित पवार भाजपात जाणार?
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे भाजपात जाणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल कधीही लागू शकतो. त्याआधीच भाजपाने सरकार वाचवण्यासाठी पर्यायी व्यवस्थेची चाचपणी सुरू केलीय असं म्हटलं जाते. त्यात प्रामुख्याने अजित पवारांसह राष्ट्रवादीचे काही आमदार भाजपासोबत जातील असं बोलले जात आहे. सध्या यावर कुणीही थेट भाष्य करत नाही. मात्र ३० एप्रिलपर्यंत भाजपात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहेत असं सूचक विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.