दैनिक स्थैर्य । दि.०९ एप्रिल २०२२ । नाशिक | महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरचे सुवर्ण महोत्सवी वर्ष व देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा अनोखा संयोग आहे; हा संयोग केवळ नाशिकलाच नाही तर संपूर्ण देशाला औद्योगिक क्षेत्रात सुवर्णयुगाकडे घेऊन जाणारा ठरेल. विकासाच्या नव्या युगात प्रवेश करण्यासाठी औद्योगिक क्षेत्राची भूमिका महत्त्वाची आहे. त्याबरोबर उद्योजकांनी स्वत:च्या प्रगतीसोबत सामाजिक विकासासाठीही आपले योगदान देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
येथील कालिदास कलामंदिरामध्ये आयोजित महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरच्या सुवर्ण महोत्सवी वर्ष प्रारंभाच्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून राज्यपाल श्री. कोश्यारी बोलत होते. यावेळी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, खासदार हेमंत गोडसे, उन्मेश पाटील (जळगाव), आमदार देवयानी फरांदे, डॉ. राहुल आहेर, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., महानगरपालिका आयुक्त रमेश पवार, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी, उमेश दशरथी, सुधाकर देशमुख आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, नाशिकचा देवभूमी, यंत्रभूमी म्हणून विकास होताना आर्थिक विकासाचा संकल्प यानिमित्ताने प्रत्येकाने करावयास हवा. उद्योजक, लोकप्रतिनिधी, प्रशासक या तिघांच्या समन्वयातून शाश्वत विकासाची पायाभरणी आपण करू शकतो. औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी काम करणाऱ्या कामगार वर्गाला आवश्यक अशा सोयीसुविधांचा विचार करून त्या पुरविण्यावर भर देणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे आज महिलादेखील प्रत्येक क्षेत्रात त्यांचे स्थान अधोरेखित करत असताना चेंबर्समध्ये महिलांचा सहभाग वाढविणे गरजेचे आहे. त्यामुळे व्यापक प्रमाणात औद्योगिक विकास होण्यास हातभार लागेल, असेही राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी सांगितले.
प्रदूषण विरहित नाशिकचा औद्योगिक विकास होण्यासाठी संकल्प करुया : पालकमंत्री छगन भुजबळ
देशाच्या औद्योगिक विकासात महाराष्ट्र हे सदा अग्रेसर राज्य असून राज्याच्या औद्योगिक विकासात नाशिकचे योगदान हे अनन्यसाधारण असे आहे. या औद्योगिक विकासासोबतच पर्यावरण संतुलनाच्या दिशेने ठोस पावले उचलण्याची गरज असून प्रदूषण विरहित नाशिकचा औद्योगिक विकास होण्यासाठी संकल्प करणे गरजेचे आहे, असे मत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.
‘मासीआ’अर्थात महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीने आजपर्यंत औद्योगिक क्षेत्रातील ‘मसीहा’म्हणून काम केले आहे. गेल्या 50 वर्षात चेंबर्सने उत्तर महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्राचा विकास करण्यासाठी अनेक उद्योजकांनी आपले योगदान दिले आहे, त्यामुळे आजच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात या सगळ्या उद्योजकांचे ऋण यावेळी पालकमंत्री यांनी व्यक्त केले. तसेच औद्योगिक क्षेत्राशी संबंधित शासकीय परवानगीसाठी ‘एक खिडकी योजना’ राबविण्यासाठी शासन व प्रशासनाच्या वतीने प्रयत्न केले जातील. मुंबई व पुण्याच्या पातळीवर नाशिक जिल्ह्याचाही विकास करुन जिल्ह्याची आर्थिक शक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचेही पालकमंत्री श्री.भुजबळ यांनी सांगितले.
सुवर्ण महोत्सवी वर्षात ‘मासिआ‘ने कृषिपूरक उद्योगांची पायाभरणी करावी : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
उत्तर महाराष्ट्रात औद्योगिक क्षेत्राला चालना मिळण्यासाठी पोषक वातावरण आणि दळणवळणाची सुविधा असल्याने या ठिकाणी उद्योगांच्या वाढीसाठी मोठी संधी उपलब्ध आहे. या संधीचा उपयोग करून ‘मासिआ’ने कृषिपूरक उद्योगांची पायाभरणी केल्यास नाशिक देशात अग्रेसर ठरेल, असे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केले.
नाशिकमध्ये द्राक्ष, कांदा, ऊस, सोयाबीन, डाळिंब अशी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. याचाच उपयोग करून स्वत:चा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी नाशिककरांना मोठी संधी आहे. याबरोबरच समृद्धी महामार्गासोबतच तसेच एच.ए.एल. येथे विमानसेवा सुरू केल्यामुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर औद्योगिक क्षेत्रात मालाची देवाण घेवाण करण्यासाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रीकल्चर यांनी स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध होतील असे उद्योग व्यवसाय वाढीस लावण्यासाठी शासन स्तरावर आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल, असेही महसूलमंत्री श्री. थोरात यांनी यावेळी सांगितले.
नाशिकचे विभागीय आयुक्त राधकृष्ण गमे यांनी जमीन किंवा प्लॉटधारकांच्या घरी जाऊन सूचना व तात्काळ नोटीस देऊन एन.ए. करण्यासाठी निर्णय घेण्याचा अतिशय चांगला उपक्रम राबविला. याबाबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावेळी त्यांचे कौतुक केले.
या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष श्री. गांधी यांनी 50 वर्षातील चेंबर्स ऑफ कॉमर्सची झालेल्या प्रगतीशील वाटचालीची माहिती दिली. कार्याक्रमप्रसंगी नाशिक विभागातील उद्योग क्षेत्रातील विविध मान्यवरांचा विकासरत्न म्हणून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.