दैनिक स्थैर्य । दि. ३० जून २०२३ । मुंबई । शाश्वत विकास ध्येयासाठी सांख्यिकीच्या कामासंदर्भात येत्या काळात अधिक धोरणात्मक नियोजन करण्याची गरज आहे. सांख्यिकी माहिती तयार करताना विश्लेषणात्मक आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केल्यास संचालनालयामार्फत सक्षम डेटाबेस तयार होण्यास मदत होईल. राज्याच्या प्रगतीत सांख्यिकी संचालनालयाची भूमिका महत्त्वाची आहे, असे सांगून नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय यांनी राष्ट्रीय सांख्यिकी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
विख्यात सांख्यिकीय शास्त्रज्ञ प्राध्यापक प्रशांतचंद्र महानलोबीस यांच्या सांख्यिकी क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांचा 29 जून रोजी येणारा जन्मदिन ‘राष्ट्रीय सांख्यिकी दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे नियोजन विभागाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाने आयोजीत कार्यक्रमात प्रधान सचिव सौरभ विजय अध्यक्ष म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमात संचालनालयाच्या विविध प्रकाशनांचे विमोचन आणि उल्लेखनीय काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमापूर्वी गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी कर्मचारी व अधिकारी यांच्याशी संवाद साधला. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे कौतुक करुन आपण स्पर्धेत असून आणखी चांगले काम केल्यास राष्ट्रीय स्तरावर आपण उल्लेखनीय काम करू शकतो अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.