
दैनिक स्थैर्य । दि. ३० डिसेंबर २०२२ । फलटण । फलटण शहरातील पृथ्वी चौक ते जुने लेडीज हॉस्टेल या ठिकाणी वाहतूक कोंडी हि नेहमीच होत असते. काही दिवसांपूर्वी पृथ्वी चौक ते जुने लेडीज हॉस्टेल येथे असणारा रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेतले. त्यानंतर फलटण शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली. पृथ्वी चौक येथे होणारी वाहतूक कोंडी ही कमी होईल अशी आशा वाहनचालकांना होती. परंतु ती आशा फोल ठरताना दिसत आहे. या ठिकाणी असणाऱ्या भल्या मोठ्या हॉस्पिटलच्या रुग्णांच्या पार्किंगसाठी रस्ता रुंदीकरण केला आहे कि काय, असा प्रश्न आता उपस्थित राहत आहे. रुंदीकरण केलेल्या रस्त्यावर वाहने पार्किंग होत असल्याने पृथ्वी चौकात होणारी वाहतूक कोंडी जैसे थेच राहिली आहे.
फलटण शहरात रस्त्यांची अवस्थेवरून प्रशासकीय यंत्रणा नेहमीच सोशल मीडियावर ट्रॉल होत असते. त्यामध्ये आता कुठे तरी रस्त्यांची कामे सुरु झाली असल्याचे दिसत आहेत. त्यामध्येच आता रस्ता रुंदीकरण व अतिक्रमण हटाव मोहीम सुरू होत आहे त्याचा उपयोग जर पार्किंगसाठी होणार असेल तर पुन्हा वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागत आहे. रस्ता रुंदीकरण झाल्यानंतर तरी वाहतूक कोंडी होणार नाही अशी आशा सर्वांना होती. परंतु होणाऱ्या पार्किंगमुळे व त्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांना पुन्हा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे.
फलटण शहरात असणाऱ्या व्यावसायिक इमारतींना त्यांचे स्वतःचे पार्किंग वास्तविक पाहता गरजेचे असते. त्याशिवाय बांधकाम परवानाच मिळत नाही. हे सर्व नियम धाब्यावर बसून अनेक बलाढ्य बांधकाम व्यावसायिकांनी व खाजगी अस्थापना असणाऱ्यांनी अधिकाऱ्यांशी साटे – लोटे करून बांधकाम परवाना मिळवले आहेत. या सर्व गोष्टींच्या पुढे जावून विचार करून आता आहे ह्या परिस्थितीमध्ये अशा सदनिका धारकांनी पार्किंगसाठी व्यवस्था करणे गरजेचे आहे. शहरातील जी रुग्णालये आहेत त्यांनी तरी त्यांच्याकडे असणाऱ्या रुग्णांच्या संख्येचा आढावा घेत पार्किंगची व्यवस्था करणे गरजेचे आहे. जर त्या ठिकाणी रुग्णालयांनी पूर्णवेळ वॉचमन उभा करून पार्किंग कोठे आहे, याची माहिती देण्यास सांगितले व रस्त्यावर पार्किंग करण्यास मज्जाव केला तरी वाहनकोंडीचा प्रश्न निकाली निघेल, असे मत वाहनचालक व्यक्त करीत आहेत.
फलटण शहर हे व्यावसायिक दृष्ट्या झपाट्याने वाढत आहे. आता आगामी काळामध्ये फलटण शहरात होणाऱ्या सर्व व्यावसायिक इमारतींना पार्किंगची सोय करूनच त्यांना बांधकाम परवाना देणे गरजेचे आहे. ज्या ठिकाणी पार्किंगची सोय नाही त्या ठिकाणी जर वारंवार गर्दी होत असेल तर त्या व्यावसायिकांना पार्किंगची सोय करून देवून व्यावसायिकांना त्या ठिकाणी वॉचमन नेमून रस्त्यावर होणारे पार्किंग रोखणे गरजेचे आहे. फक्त पृथ्वी चौक, नाना पाटील चौक किंवा जुना डी. एड. कॉलेज येथेच नव्हे तर शहरात होणाऱ्या सर्वच ठिकाणी रस्त्यावर पार्किंग होत असते. त्याठिकाणी आता प्रशासनाने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.