स्थैर्य, दहिवडी, दि. २६ : करोनाच्या महामारीत करोना ची संख्या वाढू नये याकरता प्रत्येक जिल्ह्याच्या सीमा बंदीचे आदेश जारी करण्यात आले होते. सुमारे 4 महिन्यापासून सातारा ते सोलापूर-शिंगणापूर मार्ग बंद होता. परंतु आरोग्यसेवा तातडीने मिळण्यासाठी दहिवडी-शिंगणापूरमार्गे सोलापूरला जाणारा रस्ता खुला करण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातील बहुतांशी तालुक्याचे आरोग्य, मार्केट, शेतीविषयक साहित्य, व्यावसायिक साहित्य मिळण्याची मोठी बाजारपेठ असलेल्या माळशिरस तालुक्यातील नातेपुते व अकलूज या ठिकाणी जात होते. अनेक वर्षापासून सोलापूर व सातारा जिल्ह्याचे व्यापारीकरण, आरोग्यसेवा त्वरित मिळण्यासाठी फार मोठी मदत मिळत होती. मात्र लॉकडाउन सुरू झाल्यापासून आरोग्यसेवेसह सुख सुविधा मिळणे बंद झाले. जिल्हा सीमा बंदीची काही लोकांना मोठी किंमत मोजावी लागली. शिंगणापूर व परिसरातील गावातील गेल्या 4 महिन्यापासून रुग्णांचे हाल झाले तर काही रुग्णांना वेळेत उपचार मिळाला नसल्याने जीव गमवावा लागला. येथे कोणतीही आरोग्यासंदर्भात सुविधा मिळत नसल्यामुळे अनेक अडचणीचा सामना करावा लागला. अत्यावश्यक सेवेसाठी काही तरी तोडगा काढण्यात यावा. याबाबत अनेकदा प्रसारमाध्यमाकडून आवाज उठवला गेला. जिल्हा सीमा बंदी असावी, मात्र अत्यावश्यक सेवेसाठी विशेष उपाययोजना मिळावी, अशी मागणी होत होती.
ना. देसाई हे माण तालुका करोना बाबतच्या आढावा दौर्या-वर आल्यानंतर दहिवडी येथे पत्रकार परिषदेत काही पत्रकारांनी आरोग्यसेवा तातडीने मिळण्यासाठी दहिवडी-शिंगणापूरमार्गे सोलापूरला जाणारा रस्ता खुला करून गैरसोय दूर करण्याची मागणी करण्यात आली. ना. देसाई यांनी क्षणाचा विचार न करता सोलापूर प्रशासनाशी संपर्क केला. सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी बोलतो. लवकरच नातेपुते घाट सुरू करून अत्यावश्यक सेवेमध्ये होणारी गैरसोय दूर केली जाईल. या आश्वासनाची पूर्तता करण्यात आली. अत्यावश्यक सेवेसाठी नातेपुते घाट सुरू केल्याबद्दल ना. शंभूराज देसाई यांचे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले.
अत्यावश्यक सेवेसाठी पर्यायी व्यवस्था : ना. देसाई
परिस्थितीचे गाभीर्य लक्षात घेऊन फक्त अत्यावश्यक सेवेसाठीच मुभा देण्यात यावी. तेही शासनाच्या नियमाचे पालन करावे. नियमाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर शासकीय नियमाप्रमाणे कारवाई करण्यात यावी.