
दैनिक स्थैर्य । दि. १५ डिसेंबर २०२१ । सातारा । भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षाच्या निमित्ताने देशातील महत्वपूर्ण नद्यांवर नदी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सातारा जिल्ह्यातील कृष्णा नदी उगम व गणपती घाट नदी उत्सव दि. 17 ते 23 डिसेंबर 2021 या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. हा उत्सव जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली व सातारा सिंचन मंडळाचे अधिक्षक अभियंता संजय डोईफोडे यांच्या विशेष सहकार्याने साजरा केला जाणार आहे.
या उत्सावाच्या नियोजनासाठी सातारा सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक पवार यांची जिल्हास्तरीय नोडल अधिकारी म्हणून तर महाबळेश्वरच्या तहसिलदार श्रीमती सुषमा पाटील यांची कृष्णा नदी उगम परिसर उपक्रम व वाईचे तहसिलदार रणजित भोसले यांची कृष्णा घाट गणपती मंदिर वाई परिसरातील उपक्रमासाठी नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
या उत्सवास कृष्णा नदी सेवा कार्य फाउंडेशन वाई, वाई नगर परिषदेचे मुख्याधिकारी किरण मोरे, धोम पाटबंधारे उपविभाग क्र. १ वाईचे उपविभागीय अभियंता निलेश ठोंबरे, उपविभागीय अभियंता, धोम बलकवडी सिंचन उपविभाग क्र.१ वाई तानाजी माने यांचे प्रत्यक्ष क्षेत्रीय आयोजनामध्ये सहकार्य लाभणार आहे.
या उत्सवामध्ये एक दिवस माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालयांमध्ये निबंध लेखन, चित्रकला स्पर्धा व प्रभात फेरीची आयोजन करण्यात आले आहे. पुढील दोन दिवस नदी स्वच्छतेचा उपक्रम श्रमदानातून राबविण्यात येणार आहे. त्यानंतर एक दिवस निसर्ग संवर्धानासाठीचे उपक्रम राबविण्यात येतील. नदी महोत्सवाच्या शेवटचे दोन दिवस नदी प्रदूषण, स्वच्छता, भक्ती व अध्यात्म इ. विषयांवर व्याख्यान आयोजित केले जाणार आहे.
तरी या नदी उत्सावामध्ये सर्व नागरिकांनी , सर्व शासकीय विभागांनी, उद्योजकांनी व सेवाभावी संस्थांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन सातारा सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता तथा जिल्हास्तरीय अधिकारी अशोक पवार यांनी केले आहे.