स्थैर्य, दि.२: आज भारतासमोर विविध आव्हाने असली, तरी नावीन्यपूर्ण कल्पनेतून भारताचा उत्कर्ष होईल, असा सूर राष्ट्रजागरण व्याख्यानमालेतील ‘युवकांचा भारत’ या विशेष सत्रातील युवा व्याख्यात्यांच्या निवेदनातून व्यक्त झाला.
सा. विवेकच्या ‘राममंदिर ते राष्ट्र मंदिर’ ग्रंथानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रजागरण व्याख्यानमालेचे ऑनलाइन पाचवे पुष्प गुरुवार, दि. १ ऑक्टोबर २०२० रोजी सायंकाळी सहा वाजता पार पडले. ‘युवकांचा भारत’ ह्या विशेष सत्रामध्ये ‘माहिती तंत्रज्ञान आणि भविष्यातील भारत’ या विषयावर माध्यमतंत्र अभ्यासक इंद्रनील पोळ, ‘प्रसारमाध्यमे आणि भविष्यातील भारत’ या विषयावर पत्रकार सिद्धाराम पाटील आणि ‘सेवा कार्य आणि भविष्यातील भारत’ या विषयावर स्नेहवन प्रकल्पाचे प्रमुख अशोक देशमाने यांनी आपले विचार प्रकट केले.
या प्रसंगी इंद्रनील पोळ यांनी मानवी उत्क्रांती, शेतीचा शोध, युरोपमधील औद्योगिक क्रांती आणि ५०-६० वर्षांपूर्वी झालेल्या माहिती तंत्रज्ञानाचा उदय याविषयीचा आढावा घेऊन भविष्यातील भारताविषयी मत व्यक्त केले.
पोळ म्हणाले, ‘‘डिजिटल क्रांतीमुळे अनेक कामे सोपी झाली आहेत. ज्ञानाच्या कक्षा विस्तारल्या आहेत. या बदलाचा जो कोणी स्वीकार करेल, तो उत्कर्ष साधेल.
येत्या काळात भारताला प्रगतीच्या दिशेने वाटचाल करायची असेल, तर नावीन्यपूर्ण गोष्टींचा विचार करून मार्गक्रमण करावे लागणार आहे. देशातील ४८ टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. या घटकाला माहिती तंत्रज्ञानाच्या कक्षेत आणण्यासाठी आणखी प्रयत्नाची गरज आहे’’ असे ते म्हणाले.
डिजिटल क्रांतीमुळे माध्यम क्षेत्रात झालेले बदल, आव्हाने आणि भारताचे भविष्य या संदर्भात सिद्धाराम पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
पाटील म्हणाले, ‘‘आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात स्थितप्रज्ञ व्यक्तीच या प्रवाहात टिकून राहू शकते. त्याचा योग्य वापर करू शकते. भाबडा आदर्शवाद प्रसारमाध्यमात फार काळ तग धरून राहू शकणार नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रसारमाध्यमाचा सर्वाधिक विरोध पचवून, ते माध्यमाचा प्रभावी वापर करणारे जगातील एकमेव नेते आहेत. मोदी यांची आरोग्यविषयी जागरूकता लक्षात घेता ते पुढील १५ वर्षे देशाचे नेतृत्व करतील, अशी आशा आहे.
भारताच्या उत्कर्षासाठी ध्येयवादी पत्रकारांची मोठी गरज असून, ही पोकळी भरून काढणे आवश्यक आहे’’ असे ते म्हणााले.
आज सेवा क्षेत्रात रचनात्मक आणि नावीन्यपूर्ण काम करणार्या व्यक्तींची, कार्यकर्त्यांची कमतरता आहे, याविषयी मत मांडताना अशोक देशमाने म्हणाले,
‘‘आपला भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जात असला, तरी असंख्य तरुणांकडे निश्चित दिशा आणि ध्येये नाहीत. अशा तरुणांना संघटित करून त्यांच्यामध्ये राष्ट्रभावाची व सेवाभावाची जाणीव निर्माण करणे आवश्यक आहे.
शिक्षण, आरोग्य, शेती, वंचित घटक अशा विविध क्षेत्रांत सेवाभावी कार्यकर्त्यांची गरज आहे. त्याग, सेवा आणि समर्पण या त्रिसूत्रीवर आजच्या तरुणांनी सेवा कार्य करावे, हेच आपल्या देशासाठी मोलाचे योगदान असेल.’’
दि. २ ऑक्टोबर २०२० रोजी सायंकाळी सहा वाजता प्रसिद्ध अभिनेते, लेखक व दिग्दर्शक योगेश सोमण यांचे ‘कलामाध्यमातून प्रकट होणारा भविष्यातील भारत’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. हे व्याख्यान सा. विवेकच्या फेसबुक पेजवरून व यूट्यूब चॅनलच्या https://www.facebook.com/VivekSaptahik/live https://youtu.be/GvbItWSUBNY या लिंकवरून पाहता येणार आहे.