गेल्या आठवड्यात स्पॉट गोल्डचे दर १.५९ टक्क्यांनी वाढले
स्थैर्य, मुंबई, 29 : चीन आणि अमेरिका देशांतील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येचा परिणाम सोन्याच्या किंमतींवर झाल्या असून गेल्या आठवड्यात स्पॉट गोल्डच्या दरात १.५९ टक्क्यांची वृद्धी झाली. अमेरिकी फेडरल रिझर्व्ह ऑफिसने भविष्यात बेरोजगारी वाढण्याचा इशारा दिला आहे. अर्थव्यवस्थेभोवतीची अनिश्चितता, वाढते रुग्ण यामुळे पिवळ्या धातूच्या किंमतीत वाढ झाली. तथापि, अमेरिकी डॉलरच्या मूल्यात वाढ झाल्याने इतर चलनधारकांसाठी सोने अधिक महाग झाले असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलनचे मुख्य विश्लेषक श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.
स्पॉट सिल्व्हरचे दर गेल्या आठवड्यात ०.८५ टक्क्यांनी वाढून १७.८ डॉलर प्रति औसांवर बंद झाले. एमसीएक्सवरील दर ०.५६ टक्क्यांनी घसरले व ते ४८,३६५ रुपये प्रति किलोवर बंद झाले.
मागील आठवड्यात कच्च्या तेलाचे दर ४.५ टक्क्यांनी घसरले. कारण अमेरिकी क्रूड इन्व्हेंटरी पातळीत वाढ झाली तसेच हवाई व रस्ते वाहतुकीवरील निर्बंध तसेच आहेत. एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशन (ईआयए)च्या अहवालानुसार, अमेरिकी क्रूड इन्व्हेंटरीत १९ जून २०२० रोजी संपलेल्या आठवड्यात १.४ दशलक्ष बॅरलची वाढ झाली.
द ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज (ओपेक) सदस्यांमध्ये कच्च्या तेलाची जागतिक मागणी घटल्यामुळे तीव्र उत्पादन कपात करण्यावर एकमत झाले आहे. तथापि, युरोप, आशिया आणि अमेरिकेतील अनेक देशांतील उद्योग सुरू झाल्याने तेलाच्या दरांना थोडा आधार मिळाला आहे.