मला मातीत गाढण्यासाठी श्रीमंतांनी ताकद लावली : रणजितदादांचा हल्लाबोल; अडचणीत अजितदादा पाठीशी उभे राहिले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १५ नोव्हेंबर २०२४ | फलटण | ‘‘खासदारकीची पाच वर्षे सोपी नव्हती. पहिल्या अडीच वर्षात सरकार गेल्यानंतर मला अडचणीत आणलं गेलं. अ‍ॅट्रोसिटीच्या केसेस दाखल झाल्या. माझ्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल झाला. या मातीतनं उभ्या राहिलेल्या या पोराला इथं गाढण्यासाठी श्रीमंतांनी ताकद लावली, शरद पवारांनीही ताकद लावली. पण हिंदीमधल्या ‘वो शमा क्या बुझे, जिसकी हिफाजत हवा करे’ म्हणीप्रमाणे परमेश्‍वर कृपेने माझ्यासाठी भाजपचे नेते, देवेंद्र फडणवीस लढत होते. विरोधातला एकच नेता माझ्या पाठीशी होता तो म्हणजे अजित पवार. म्हणूनच आत्ता अजितदादांना आपण स्विकारलं’’, असे प्रतिपादन माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले.

फलटण – कोरेगांव विधानसभा मतदारसंघातील महायुती पुुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सचिन पाटील यांच्या प्रचारार्थ फलटण शहरातील मलटण परिसरात आयोजित कोपरा सभेमध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महायुतीतील घटक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

खोट्या प्रचारामुळे आपण रनआऊट झालो

‘‘खासदारकीच्या कारकीर्दीत मोठ्या प्रमाणावर निधी आणण्याचं कामं आपण केलं. भारतीय जनता पार्टीत काम करणार्‍या खासदारांमध्ये मी पहिल्या सातव्या आठव्या क्रमांकावर होतो. त्यामुळे पहिल्याच यादीत माझी उमेदवारी जाहीर झाली होती. फलटणकरांनी 22 हजारांच मताधिक्य दिलं पण खोट्या प्रचारामुळे आपण रनआऊट झालो. लोकसभेला तुम्ही मला मताधिक्य दिलं पण गुलाल काय तुम्हाला मी आणून देवू शकलो नाही. पण आता सचिन पाटील यांच्या विजयाचा गुलाल 100% मी आणणार आहे’’, असा विश्‍वास रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी व्यक्त केला.

फलटण तालुक्याला निधी अजिबात कमी पडणार नाही

‘‘यश अपेक्षित असताना पराभव माघारी घेवून आलो. पण पराभवानंतरही फिनीक्स पक्षाप्रमाणे आपण उभारी घेतली आहे. खासदारकीच्या काळात जवळपास 150 कोटी चा निधी फलटणसाठी आपण आणला. नेत्यांनी मंजूर करुन आणलेली रेल्वे सुरु केली, निरा देवघरचं पाणी आपण पुढं आणलं, धोम बलकवडी बारमाही करण्यात आपण यशस्वी झालो. पराभूत झाल्यानंतरही आपण 400 कोटी या तालुक्याला आणू शकतो तर सचिन पाटील जर आमदार म्हणून विजयी झाले तर देवेंद्र फडणवीसांकडून मी आहे आणि अजित पवारांकडून सचिन पाटील आहेत; त्यामुळे निधी फलटण तालुक्याला अजिबात कमी पडणार नाही’’, असेही अभिवचन रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी दिले.

70% पर्यंत मत फलटण शहरातून सचिन पाटील यांना मिळतील

‘‘आधुनिक शहरातील सुविधा मलटणसाठी मंजूर करुन घेतल्या आहेत. मलटणची जनता स्वत:च्या हिंमतीवर मोठी झालेली आहे. बारामतीला बघून तुम्ही जी स्वप्नं बघत आहात ती स्वप्न मलटण आणि फलटणमध्ये प्रत्यक्ष उतरवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. माझी घरची माणसं माझी रक्षा करतात; त्यामुळं मलटण यंदा परिवर्तनामध्ये सर्वात आघाडीवर असणार आहे. मलटणप्रमाणे फलटणकरांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. फलटणमधल्या सर्व वॉर्डमधून आपण मताधिक्य घेतलं होता. आत्ताही फलटणकर आपल्याला मताधिक्य देणार आहेत. 70% पर्यंत मत फलटण शहरातून सचिन पाटील यांना मिळतील. कुणी कितीही ताकद लावूद्यात, कुणी कितीही पळू द्यात. सचिन पाटील घड्याळाच्या चिन्हावर 100% विजयी होतील’’, असा ठाम विश्‍वास रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी व्यक्त केला.


Back to top button
Don`t copy text!