स्थैर्य,पोर्ट औ प्रिंस, दि. २७: हैती देशातील एका कारागृहातील कैद्यांनी बंड करून तेथील सुरक्षा रक्षकांशी दोन हात केले आणि त्यावेळी झालेल्या धुमश्चक्रीत 25 जण ठार झाले तर तेथील सुमारे चारशे कैदी तेथून परागंदा झाले. या शहराच्या उत्तरपुर्वेकडील भागात असलेल्या क्रोईएक्स देस बकेट्स कारागृहात हा प्रकार घडला.
गेल्या अनेक दशकातील अशा प्रकारची ही सर्वात भीषण घटना आहे. या कारागृहात त्या देशातील सर्वात कुख्यात गॅंगस्टर अर्नेल जोसेफ याला ठेवण्यात आले होते. त्याला सोडवण्यासाठी तेथे ही दंगल घडवण्यात आली असे अनेकांचे म्हणणे आहे. जोसेफवर बलात्कार, अपहरण, खून असे अनेक गुन्हे दाखल आहेत.
तो कारागृहातून बाहेर निसटल्यानंतर एकेठिकाणी त्याची सुरक्षा जवानांशी गाठ पडली त्यावेळी झालेल्या चकमकीत तो मारला गेला. जोसेफ हा डी दिऊ गावातील रहिवासी होता. त्याची तेथे एकहाती सत्ता होती असे मानले जाते. त्याच्या ताब्यातील या गावात कोणताही सरकारी धाक उरलेला नव्हता.
दरम्यान कैद्यांच्या बंडानंतर तेथे झालेल्या धुमश्चक्रीचा लाभ उठवून जे केैदी परागंदा झाले, त्यातील चाळीस जणांना पुन्हा पकडण्यात यश आले आहे. त्या देशात 2014 साली तुरूंग फोडण्याचा असाच एक प्रसंग घडला होता. त्यानंतर झालेल्या या घटनेत इतक्या मोठ्या प्रमाणात प्राणहानी झाल्याचा हा पहिलाच प्रसंग आहे.