रत्नागिरी वैद्यकीय महाविद्यालयाबाबतचा सुधारित प्रस्ताव प्राधान्याने मंत्रीमंडळ बैठकीत सादर करावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २६ जुलै २०२२ । रत्नागिरी । रत्नागिरी येथे नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार असून यासाठीचा सुधारित प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाने प्राधान्याने मंत्रीमंडळ बैठकीत सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

रत्नागिरी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासंदर्भातील आढावा बैठक मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस आमदार उदय सामंत, मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्यासह व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, राज्यामध्ये वैद्यकीय सेवा सुविधांचे जाळे विस्तारत असताना रत्नागिरी येथील नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणीच्या कामाला गती देणे आवश्यक आहे. त्यामुळेच प्राधान्याने या महाविद्यालय उभारणीबाबतचा सुधारित प्रस्ताव सादर करावा. याबरोबरच या शैक्षणिक वर्षांपासून हे महाविद्यालय सुरु करता येईल का, सुरु करायचे झाल्यास आवश्यक ती पूर्वतयारी करावी, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या निकषानुसार नवीन वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी किमान सलग 20 एकर जागा असणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने जागा निश्चित करुन वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरीत करण्याबाबतची कार्यवाही करावी. वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठीचा परिपूर्ण प्रस्ताव (आवश्यक असणारा निधी, मनुष्यबळ, तांत्रिक उपलब्धता) तयार करावा. रत्नागिरी जिल्ह्यात शासकीय रुग्णालय, महिलांचे रुग्णालय आणि मनोरुग्णालय एकत्र असलेल्या परिसरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. वैद्यकीय महाविद्यालय उभारताना या जागेचे सर्वेक्षण करण्यात येणार असून वित्त व नियोजन, महसूल आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांचे अभिप्रायही घेण्यात यावेत, अशा सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिल्या.


Back to top button
Don`t copy text!