बारावीचा निकाल आज जाहीर होणार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, पुणे, दि. 15 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक महामंडळाच्या वतीने फेब्रुवारी- मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 12 वीचा ऑनलाइन निकाल आज (गुरुवार, दि. 16) रोजी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येणार आहे.

बारावीचा निकाल खालील वेबसाईटसवर पाहता येणार आहे.

www.mahresult.nic.in

www.hscresult.mkcl.org

www.maharashtraeduction.com

पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळात उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (12वी) पार पडली. परंतु, कोरोनाच्या संकटामुळे दहावी आणि बारावीचे निकाल लांबले आहेत. मे-जून महिन्यात जाहीर होणारा बारावीचा निकाल जाहीर होण्यासाठी यंदा जुलै महिना उजाडला आहे.  शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनीही 15 जुलैपर्यंत बारावीचा तर जुलैअखेरपर्यंत दहावीचा निकाल जाहीर होईल, असे सांगितले होते.

यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी एकूण 15  लाख 5 हजार 27 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. एकूण 9923 कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली होती आणि पूर्ण राज्यातील जवळपास 3036  परीक्षा केंद्रांवरून ही बारावीची परीक्षा घेण्यात आली. यामध्ये  विज्ञान शाखेचे 5 लाख 85 हजार 736, कला शाखेचे 4 लाख 75 हजार 134, तर वाणिज्य शाखेचे 3 लाख 86 हजार 784 विद्यार्थी परीक्षेला बसले होते.  व्यावसायिक अभ्यासक्रमाचे 57 हजार 373 विद्यार्थी आहेत. 

बारावीच्या सर्वच शाखांची परिक्षा 18 फेब्रुवारी ते 18 मार्च या दरम्यान पार पडली. लॉकडाउनच्या आधी बारवीची परीक्षा जरी संपली असली तरीही लॉकडाउनमुळे उत्तरपत्रिका तपासणी आणि त्यांचं संकलन यामध्ये बर्‍याच अडचणी आल्या. त्यामुळे मागच्या वर्षी 28 मेला बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला होता. पण यावर्षी लॉकडाउनमुळे बारावीचा निकाल लागण्याला उशीर झाला आहे.

मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी सूचना

ऑनलाइन निकालाबाबत लगेच दुसर्‍या दिवसापासून उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना स्वत:च्या अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळालवरून (http://verification.mh-hsc.ac.in) स्वत:च्या किंवा शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय या परीक्षेपासून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी-शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आल्या आहेत. गुणपडताळणीसाठी शुक्रवार, दि. 17 ते 27 जुलैपर्यंत व छायाप्रतीसाठी शुक्रवार, दि. 17 जुलै ते 5 ऑगस्टपर्यंत अर्ज ऑनलाइन पद्धतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाइन पद्धतीने शुल्क भरता येईल

फेब्रुवारी-मार्च- 2020 परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांतच पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून विहित नमुन्यात विहित शुल्क भरून संबंधित निभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.

फेब्रुवारी-मार्च 2020 च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी श्रेणी/गुणसुधार योजनेंतर्गत उपलब्ध राहतील.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!