दैनिक स्थैर्य | दि. १२ जून २०२३ | सातारा |
राष्ट्रवादीचा वर्धापन दिनाच्या औचित्याने सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना जबाबदारी दिली आहे. अजित पवार यांच्यावर कुठल्याही प्रकारची जबाबदारी टाकली नसल्याचे संदेश माध्यमांमधून फिरत आहेत. परंतु, वास्तविक माझ्यावर महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी आहे. तसेच पक्षाचे विविध दौरे, पक्षीय अधिवेशने व कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्यभर फिरत असून माझी जबाबदारी मी पार पाडतच आहे. मला केंद्रातल्या राजकारणात रस नसून मला राज्यात काम करायचे आहे, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी रविवारी सातारा येथे केले.
अजितदादा पवार यांच्या हस्ते रविवारी सातारा येथील कैलास स्मशानभूमीमध्ये गॅस दाहिनी उपक्रमाचे लोकार्पण झाले. तत्पूर्वी शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
अजितदादा म्हणाले की, भाकरी फिरवली असल्याचे फडणवीस म्हणतात, यावर भाकरी फिरवली, असे प्रसारमाध्यमांनीच चालवलं आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी काय म्हणायचे हा त्यांचा प्रश्न आहे. पण राष्ट्रवादीने काय करायचे, हे राष्ट्रवादीची कार्यकारिणी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी ठरवतील.
विरोधकांकडून फोडाफोडाचे राजकारण होत असल्याबाबत अजित पवार म्हणाले, प्रत्येक पक्ष आपापला पक्ष वाढवण्याचे काम करत असतो.
भाजपाचे सोडून गेलेले नेते तुमच्या संपर्कात आहेत काय, असे विचारले असता अजित पवार म्हणाले, मी उपमुख्यमंत्री असताना कुणी काही काम घेवून आले तर पक्षीय नजरेतून न पाहता प्रत्येकाचे काम करण्याचा प्रयत्न केला. आम्ही काय एकमेकाचे दुश्मन नाही.
सोळा आमदार अपात्र ठरले तरी सरकार पडणार नाही. कारण यदाकदाचित १६ आमदार अपात्र होवूनही आमदारांचे संख्याबळ सत्ताधार्यांकडे राहत आहे. विधानसभा अध्यक्षांच्या समोर सुनावणी आहे. एखाद्या आमदाराने आठ दिवसांची मुदत मागितली तरी सुनावणीलाच वर्ष जाईल. पक्षांतर बंदी कायद्यानुसार काय निर्णय द्यायचा, याबाबत विधानसभेचे अध्यक्षच अधिकारवाणीने सांगू शकतील, असे अजित पवार यांनी सांगितले.
कोण ‘लंबी रेस का घोडा’ ते राष्ट्रवादी बघेल
नीतेश राणे यांनी पार्थ पवार ‘लंबी रेस का घोडा’ असल्याचे म्हटल्याबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले, ‘लंबी रेस का घोडा की छोटी रेस का घोडा’ ते राष्ट्रवादी बघेल.
औरंगजेबाचे उदात्तीकरण महाराष्ट्रात करण्याचे काहीच कारण नाही. सरकार कोणाचेही असो, अशा घटना घडू नयेत. या घटनांचा सखोल तपास केला करून ‘मास्टरमाईंड’ शोधून काढला पाहिजे. अशा घटना आत्ताच का घडत आहेत, यातून जातीय द्वेष पसरवण्याचे काम केले जात आहे. काही पक्षांचे प्रवक्तेही जी वक्तव्ये करतात, त्यातून वातावरण खराब होत आहे. पक्षाला उभारी येण्यासाठीच कामाचे वाटप केले आहे. कार्याध्यक्षांना थोडा वेळ द्या. पक्षप्रमुखांनी दिशा दाखवल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्या दिशेने पक्ष वाढवायचा आहे, असे अजितदादा म्हणाले.
पुढे अजितदादा म्हणाले की, सातारा लोकसभेला कोण उमेदवार हे इतक्यात सांगता येणार नाही. कारण महाविकास आघाडीचे जागावाटप व्हायचे आहे. परंतु, महाविकास आघाडीचा उमेदवार नक्की विजयी होईल.