
दैनिक स्थैर्य । दि. २२ जुलै २०२२ । सातारा । ऊसाची आडवा आडवी जिरवा जिरवी करू नका, आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सामान्य जनतेचे, शेतकऱ्यांचे, बळीराजाचे राज्य आले आहे, असे आमदार महेश शिंदे यांनी नमूद केले. दरम्यान आता बारामतीकरांचे राज्य संपलं आहे अशी टिप्पणीही आमदार महेश शिंदे यांनी करत हे ध्यानात घ्या आणि नीट वागा असा इशारा राष्ट्रवादी काॅंग्रसेला दिला आहे. तडवळे (ता. काेरेगाव) येथील एका कार्यक्रमात आमदार महेश शिंदे बाेलत हाेते. ते म्हणाले आमची काय ताकद आहे हे दाखवून दिलं आहे. त्यांच्या मालकाला पण धाेबीपछाड दिलं. दिवसा चांदण्या दाखवल्या. आमच्या नादाला लागला तर आम्ही किती बाद करु शकताे हे दाखवायचे काम आम्ही महाराष्ट्रास दाखविलं आहे.
काहीजण म्हणत आहेत आमदार महेश शिंदे याला पाडणार. हा हक्क तुम्ही कधीच गमावला आहे. खरंतर मी असला विचार कधीच करत नाही. जनताच तुम्हांला तुमची जागा दाखविणार आहे असा टाेला आमदार महेश शिंदे यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्यावर केला.
त्यामुळे तुम्हांला मत मागण्याचा अधिकार राहिला नाही. सातारा जिल्ह्यात आता बारामतीकरांना स्थान नाही. आज राज्यात शेतक-यांचे राज्य आले आहे. शिंदेशाही- फडणवीसांचे राज्य आले असून सामान्य जनतेसाठी ते झटत आहेत असेही आमदार शिंदे यांनी नमूद केले. या कार्यक्रमास काेरेगाव नगरविकास आघाडीचे पदाधिकारी, आजी- माजी नगरसेक, नगरसेविका उपस्थित हाेते.