स्थैर्य,औरंगाबाद, दि १४: पडेगावातील मिटमिटा तलावाजवळ पाठीला थाप का मारल्याची विचारणा केल्याचा राग मनात धरत, घरातून चाकू आणून तरुणाची हत्या करण्यात आली आहे. हि घटना दि. १३ शनिवारी सकाळी घडली. लक्ष्मण रघुनाथ चव्हाण असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून संजू काळे असे आरोपीचे नाव आहे.
मिटमिटा तलावाजवळ दि. १३ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास लक्ष्मण रघुनाथ चव्हाण ,संजु काळे, श्रीमंत काळे ,क्रांती शिंदे हे दारु पित बसलेले होते. लक्ष्मण चव्हाण हा तिथुन उठुन घराकडे निघाला हे पाहून संजु काळे याने लक्ष्मणच्या पाठीवर थाप मारली, या कारणाने लक्ष्मणने संजुला तु माझ्या पाठीवर का थाप मारली अशी विचारणा केली. याचा राग संजु काळेला आला तो लक्ष्मणला म्हणाला तु मला का विचारतो थांब मी तुला आता दाखवतो असे म्हणून संजु काळे जवळच असलेल्या त्याच्या घरी गेला, तिथून त्याने चाकु आणला आणि लक्ष्मणच्या पोटावर चाकुने वार केले. लक्षमण याला वाचविण्यासाठी त्याचा लहान भाऊ भिसन चव्हाण घटनास्थळापासून जवळच असल्याने पळत आला, तो हे भांडण सोडवत असताना, संजू काळे याने त्याच्या हातावर देखील चाकुने वार केले, आणि त्यालाही जखमी केले. त्यानंतर संजू काळे तिथून फरार झाला.
लक्ष्मणच्या पोटात चाकु मारल्याने त्याचे पोटातुन खुप रक्त निघु लागले त्यामुळे परिसरात खूप आरडाओरडा झाला. नंतर तिथे बरेच लोक जमा झाले तेवढ्यात संजु काळेची बायको उषा संजु काळे ही बाहेर आली. जखमी लक्ष्मणला त्याचा मेहुणा देवानंद चव्हाण, शिवराव कांतीलाल भोसले यांनी मोटार सायकल वर बसून घाटी दवाखाण्यात नेले. भिसन त्यांच्या मागे रिक्षाने घाटीकडे निघाला परंतु, त्याच्या हातातून रक्तस्त्राव जास्त होत असल्याने, तो घाटीत न जाता पाडेगाव येथील खासगी रुग्णालयात गेला.
उपचार झाल्यावर भिसन घाटी मध्ये आला तिथे देवानंद , शिवराव तसेच संजुची बायको उषा, जखमी लक्ष्मण असे डॉक्टर जवळ होते. त्यानंतर लक्ष्मणला डॉक्टरांनी तपासुन त्याच्यावर ईलाज सुरु केला. परंतु दुपारी दीडच्या सुमारास डॉक्टरांनी लक्ष्मणला उपचारा दरम्यान मृत घोषित केले.
उषा हीने घाटीत तिच्या पतीला वाचविण्यासाठी डॉक्टरांना लक्ष्मणचे खोटे नाव लक्ष्मण बारकु काळे असे सांगीतले. त्यानंतर तो राहत्या घरी स्वतः टोकदार वस्तुवर पडला त्यामुळे त्याचे पोटाला जखम झाली असा बनाव केला. यावरच न थांबता तिने स्वतःचे नाव सुध्दा पुजा यश काळे असे खोटे सांगीतले. यावरून छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग भागिले हे करीत आहे.