युवा पिढीने देश रक्षणासाठी आघाडीवर येणे हीच जनरल बिपीन रावत यांना खरी श्रद्धांजली – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २८ एप्रिल २०२२ । मुंबई । उत्तराखंडचे महान सुपुत्र असलेले देशाचे पहिले संयुक्त लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी आपले संपूर्ण जीवन राष्ट्राला समर्पित केले.  जनरल बिपीन रावत यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन युवा पिढीने देश रक्षणासाठी पुढे येणे हीच यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे उद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे काढले.

सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या जीवन कार्याचा परिचय तसेच त्यांच्या वरील लेखांचे संकलन असलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 28) राजभवन येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते.

‘उत्तरांचल महासंघ, मुंबई’ या संस्थेच्या वतीने स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाला आमदार मंगलप्रभात लोढा, उत्तरांचल महासंघाच्या अध्यक्षा आनंदी गैरोला, महेंद्रसिंह गुसाईं व कुसुमलता गुसाईं प्रामुख्याने उपस्थित होते.

उत्तराखंड राज्यात लष्करात भरती होऊन देशसेवा करण्याची परंपरा आहे. राज्याने जनरल बी सी जोशी व जनरल बिपीन रावत यांसारखे महान योद्धे सुपुत्र देशाला दिले आहेत. प्रत्येक जण त्यांची उंची गाठू शकणार नाही, परंतु देशासाठी काही ना काही योगदान देण्याचा प्रयत्न प्रत्येकाने अवश्य केला पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले.

इस्रायल देशात सार्वजनिक ठिकाणी देशासाठी बलिदान देणाऱ्या त्या भागातील लष्करी जवानांचा परिचय असलेले शिलालेख लावण्यात येतात असे सांगून जनरल बिपीन रावत यांच्या कार्याची माहिती शालेय मुलांना व्हावी यासाठी आपण 2000 शाळांमध्ये जनरल बिपीन रावत यांच्या स्मरणिकेचे वाटप करणार असल्याचे लोढा यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!