
स्थैर्य, विडणी, दि. ४ फेब्रुवारी : विडणी येथे पार पडलेल्या भाजप प्रवेश सोहळ्यात आज राजकीय भूकंपाची लाट पाहायला मिळाली. वडले गावातील सत्ताधारी गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. यामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत वडले गावात विरोधकांचा सुपडा साफ होणार, हे आता स्पष्ट झाले आहे.
दिग्गजांची ‘इनकमिंग’ सुरूच
केवळ सामान्य कार्यकर्तेच नव्हे, तर गावचे कारभारी असणारे विद्यमान आणि माजी पदाधिकारी रणजितसिंहांच्या गळाला लागले आहेत. यामध्ये वडले ग्रामपंचायतीच्या विद्यमान उपसरपंच सौ. स्वाती पांडुरंग मोरे, पांडुरंग मोरे, प्रबुद्ध मोरे पाटील, माजी उपसरपंच संतोष मोरे, अमोल मोरे, हिरामण मोरे आणि संतोष जगताप यांचा समावेश आहे. तसेच ‘मित्र समूह वडले’ च्या असंख्य तरुणांनीही यावेळी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला.
विकासाच्या प्रवाहात सामील
गेल्या काही वर्षांत रामराजे गटाकडून केवळ आश्वासनांची खैरात झाली, मात्र ठोस विकासकामे रणजितसिंहांच्याच माध्यमातून झाली, अशी भावना या प्रवेशकर्त्यांनी व्यक्त केली. रणजितसिंहांच्या माध्यमातून नीरा-देवधरचे पाणी आणि रस्ते विकासाचे जाळे विणले जात असल्याने, वडले गावाचे भविष्य ‘कमळा’सोबतच सुरक्षित आहे, असा विश्वास माजी उपसरपंच संतोष मोरे आणि उपसरपंच सौ. स्वाती मोरे यांनी व्यक्त केला.
यावेळी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे स्वागत करताना, “वडले गावाचा सर्वांगीण विकास आता माझी जबाबदारी आहे,” अशी ग्वाही दिली. या प्रवेशामुळे वडले गावात भाजपची ताकद कित्येक पटीने वाढली असून, विरोधकांची अवस्था ‘धोबीपछाड’ झाल्यासारखी झाली आहे.

