
दैनिक स्थैर्य । 16 मार्च 2025। फलटण । कोळकी पंचायत समिती गणाचे माजी सदस्य तथा युवा नेते सचिन रणवरे यांच्यासह कोळकी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विकास नाळे, राष्ट्रवादीचे माजी युवक अध्यक्ष पै. संजय देशमुख, युवा नेते किरण जाधव, सागर चव्हाण व सागर काकडे यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश केला आहे.
युवा नेते सचिन रणवरे यांचा तालुक्यात दांडगा संपर्क
कोळकी पंचायत समिती गणाचे माजी सदस्य तथा युवा नेते सचिन रणवरे यांचे मूळ गाव फलटण तालुक्यातील जिंती हे आहे. यासोबतच त्यांच्या बालपण हे संपूर्ण कोळकीमध्ये गेले असून ते कोळकी गावचे रहिवासी आहेत. त्यांचा कोळकी व जिंती गावामध्ये मोठा संपर्क आहे. यासोबतच संपूर्ण फलटण तालुक्यात सुद्धा त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशाने फक्त कोळकी पंचायत समिती गणामध्ये नाही तर नक्कीच तालुक्यात मोठा धक्का आगामी काळामध्ये बसेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. युवा नेते सचिन रणवरे यांच्याकडे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदारकीचा उमेदवार म्हणून त्यांचे नाव हे चर्चेत होते. स्वच्छ प्रतिमा म्हणून त्यांची तालुक्यात ओळख आहे.
विकास नाळे यांचा कोळकीत नात्यांचा गोतावळा
कोळकी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य विकास नाळे यांनी त्यांच्या नेतृत्वात त्यांचा संपूर्ण प्रभाग अर्थात ३ ग्रामपंचायत सदस्य निवडून आणले आहेत. त्यांच्या प्रभागामध्ये जे कामकाज कायमस्वरूपी करत असतात त्यामुळे त्या प्रभागात बड्या नेत्यांना प्रचाराला सुद्धा येण्याची आवश्यकता लागली नव्हती. अपवाद वगळता गत ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांच्या प्रभागात कोणत्याही बड्या नेत्याची प्रचार सभा हि त्यांच्या प्रभागात झाली नव्हती. यसोबतच विकास नाळे यांचा नात्यांचा गोतावळा हा कोळकी गावामध्ये असल्याने आगामी काळात नक्कीच याचा फटका राजे गटाला बसणार आहे.
पै. संजय देशमुख यांचा फलटण तालुक्यात कॉन्टॅक्ट
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष पै. संजय देशमुख यांचा फलटण तालुक्यामध्ये मोठा जनसंपर्क आहे. संजय देशमुख यांच्या पत्नी सौ. रेश्मा देशमुख यांनी कोळकी ग्रामपंचायतीच्यावर सरपंच म्हणून उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे. त्यांच्या काळामध्ये कोळकी ग्रामपंचायतीला विविध पुरस्कार सुद्धा प्राप्त झाले आहेत. संजय देशमुख यांचा त्यांच्या प्रभागात सुद्धा पहिल्यापासून चांगला संपर्क आहे. राजकारणाच्या पूर्वीपासून भगवा कट्टा गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्यामध्ये संजय देशमुख यांचा सहभाग राहिला आहे.
किरण जाधव, सागर चव्हाण, सागर काकडे यांचे प्रभागात मोठे कामकाज
कोळकी ग्रामपंचायतीच्या विविध प्रभागामध्ये असणारे सदस्य किंवा सदस्यांच्या घरातील कर्ते, धर्ते हे सुद्धा राजे गटाला राम राम ठोकत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करीत आहे. यामध्ये युवा उद्योजक किरण जाधव यांच्या मातोश्री या आता ग्रामपंचायत सदस्या आहेत. तर सागर चव्हाण व सागर काकडे यांच्या सुविद्य पत्नी ह्या आता ग्रामपंचायतीमध्ये प्रतिनिधित्व करीत आहेत. तर अविनाश सरतापे यांच्या त्यांच्या प्रभागासह भागामध्ये सामाजिक कामकाज मोठे आहे.
राजे गटाची कोळकी गावासह जिल्हा परिषद गटाची भिस्त आता अक्षय गायकवाड यांच्यावर
गत ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अक्षय गायकवाड यांना राजे गटाने उमेदवारी दिली नाही म्हणून बंडखोरी करून निवडून आलेले ग्रामपंचायत सदस्य अक्षय गायकवाड यांचा संपूर्ण कोळकी गावावर मोठा प्रभाव आहे. अक्षय गायकवाड यांचे कार्यकर्ते सुद्धा कोळकी ग्रामपंचायतीच्या प्रत्येक प्रभागात आहेत. आगामी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत अक्षय गायकवाड यांच्यावरच कोळकी गावाची भिस्त असणार आहे.
विधानपरिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे अत्यंत विश्वासू व निकटचे सहकारी म्हणून अक्षय गायकवाड यांची ओळख हि तालुक्यात नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात आहे. अक्षय गायकवाड यांच्या कामकाजावर खुश होऊन श्रीमंत रामराजे यांनी ग्रामपंचायतीच्या पहिल्या टर्ममध्येच अक्षय गायकवाड यांना फलटण बाजार समितीवर सुद्धा संचालक म्हणून कामकाज करण्यासाठी पाठवले आहे. त्यांच्या कामकाजाचा मोठा फायदा हा बाजार समितीला सुद्धा वेळोवेळी होत असतो.
यासोबतच आगामी काळामध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत कोळकी जिल्हा परिषद गट हा राखीव होण्याची दाट श्यक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राजे गटाकडे अक्षय गायकवाड यांच्याशिवाय संपूर्ण कोळकी जिल्हा परिषद गटामध्ये कोणताही पर्याय नसल्याच्या चर्चा सुद्धा आजच्या प्रवेशाच्यानंतर राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.
श्रीमंत रामराजेंचे डॅमेज कंट्रोलसाठीचे प्रयत्न असफल
कोळकी गाव हे सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे गाव म्हणून ओळखले जाते. त्याचे कारण सुद्धा तसेच आहे. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे मतदान हे कोळकी गावामध्येच आहेत. त्यामुळे कोळकी गावाची किल्ली रणजितसिंह यांच्याकडे जावू नये म्हणून आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी कोळकी गावच्या पुढाऱ्यांची काल दि. १५ रोजी दुपारी तातडीची बैठक बोलावली होती. सदरील बैठकीमध्ये काही जण उपस्थित होते तर काहींनी दांडी मारली व थेट भाजपाचा रस्ता पकडला आहे; हे आज होत असलेल्या प्रवेशाने सिद्ध झाले आहे.
कोळकी ग्रामपंचायतीची निवडणूक हि अवघ्या सहा, आठ महिन्यांवर येवून ठेपली आहे. अशामध्ये कोळकी गावच्या प्रमुख गाव पुढार्यांनी राजे गटाला राम राम ठोकत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्याने आगामी निवडणुकीत राजे गटाला मोठी कसरत करावी लागणार आहे.