विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 3 ऑगस्टपर्यंत लांबणीवर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि. 10 : राज्यावर कोरोनाचे संकट असताना राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 3 ऑगस्टपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर 22 तारखेला अधिवेशन घेणे शक्य नाही, असे लक्षात आले आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाल्यानंतर 3 ऑगस्टला अधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आला. पुरवण्या मागण्यांसाठी एक दिवसाचे अधिवेशन घेण्याची शक्यता आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.

कोरोनाची साथ सुरू झाल्याने आठवडाभर आधीच राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गुंडाळण्यात आले होते. कोरोनाच्या रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे पावसाळी अधिवेशनावर अनिश्‍चिततेचे सावट होते. हे अधिवेशन ठरल्याप्रमाणे घ्यायचे की पुढे ढकलायचे याबाबत विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठकही पार पडली होती.

यापूर्वी पावसाळी अधिवेशन 22 जूनपासून सुरू होईल, असे जाहीर करण्यात आले होते. पण 30 जूनपर्यंत सर्व रेल्वे आरक्षण रद्द झाल्याने राज्याच्या कानाकोपर्‍यातून आमदार व त्यांचे कर्मचारी मुंबईत कसे येणार, कोरोनाच्या काळात ही गर्दी करायची का, असे प्रश्‍नही समोर होते. त्यामुळे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्याबाबत विचार सुरू होता. दरम्यान, दि. 3 ऑगस्टपासून राज्य सरकारच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. मात्र हे अधिवेशन फक्त चार दिवसांचेच होणार असल्याचे सांगितले जात आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर हे अधिवेशन लवकर आटोपले जाणार असल्याची माहिती आहे.

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 20 मार्चपर्यंत चालणार होते. परंतु कोरोनाच्या साथीला तोंड देण्यासाठी विधिमंडळाच्या कामकाजातून प्रशासनाला मुक्त करण्यासाठी 14 मार्चला अधिवेशन गुंडाळण्यात आले होते. पावसाळी अधिवेशन 22 जूनपासून सुरू होईल, असे जाहीर करण्यात आले होते. मात्र, राज्यात कोरोनाची साथ कायम असल्याने सर्व यंत्रणा कोरोना नियंत्रण व इतर अनुषंगिक गोष्टींमध्ये गुंतल्या आहेत. त्यामुळे अधिवेशन नेमके कधी होणार, असा प्रश्‍न निर्माण झाला होता. परंतु आता अधिवेशनाची तारीख ठरल्यामुळे संभ्रम दूर झाला आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!