
स्थैर्य, दहिवडी (जि. सातारा), दि.७ : ऑक्टोबर महिना संपेपर्यंत माण तालुक्याला झोडपून काढल्यानंतर सध्या पाऊस गायब झाला आहे. नोव्हेंबरच्या सुरवातीलाच थंडीची चाहूल लागली आहे. सध्या दिवसा कडक ऊन तर रात्री बोचणारी थंडी असे वातावरण सुरू आहे.
मुसळधार पावसामुळे यावर्षी हिवाळा कधी सुरू होणार, याची प्रतीक्षा सर्वांना लागून राहिली होती. मात्र, नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात थंडीच्या आगमनाने हिवाळा सुरू झाल्याची चाहूल लागली आहे. दिवसा साधारण 28 ते 31 अंश सेल्सिअस तापमान आहे. तर रात्री या तापमानात घट होऊन पहाटे साधारण 15 ते 18 अंश सेल्सिअसपर्यंत पारा खाली येत आहे. मागील वर्षी म्हणावी अशी थंडी जाणवली नाही. पण, यावर्षीच्या हिवाळ्याची सुरुवात पाहता कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे.
सध्याचे पोषक वातावरण असेच कायम राहिले तर शेतकऱ्यांचे मुसळधार पावसाने झालेले नुकसान काही प्रमाणात भरून निघू शकते. रब्बीच्या हंगामातील थंड वातावरण गहू, हरभरा, ज्वारी, वाटाणा या पिकांसाठी महत्त्वाचे असते. अशा पोषक हवामानामुळे भरघोस पीक निघू शकते. बदललेल्या पोषक वातावरणामुळे झालेले नुकसान विसरून नव्या जोमाने बळिराजा रब्बी हंगामाच्या तयारीत गुंतला आहे.