दैनिक स्थैर्य । दि. २९ ऑकटोबर २०२२ । फलटण । केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांनी पुणे ते बेंगलोर या महामार्गाला समांतर असलेला नवीन हरित महामार्ग करणार असल्याची घोषणा काही महिन्यांपूर्वी केलेली होती. त्यानंतर हा हरित महामार्ग कसा व कोठे जाणार ? याबाबत उत्सुकता लागून राहिलेली होती. अखेर ही उत्सुकता संपली असून हा हरित महामार्ग खंडाळा तालुक्यातून येऊन फलटण तालुक्यामधून पुढे जाणार आहे. याबाबतचे अधिकृत राजपत्र भारत सरकारच्या वतीने प्रकाशित करण्यात आले आहे.
पुणे ते बेंगलोर तयार करण्यात येणारा नवीन हरित महामार्ग हा सातारा जिल्ह्याच्या खंडाळा व फलटण तालुक्यामधून जाणार आहे. यासाठी जमीन अधिग्रहण करण्यासाठी फलटणच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आलेले आहेत.
सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यामधून शिरवळ, धनगरवाडी, पिसाळवाडी, भोळी, माने कॉलनी, शेखमिरवाडी, भादवडे, शिवाजीनगर, बावडा, म्हावशी, खेड बी. के., सुखेड, अहिरे, धावडवाडी, निंबोडी व कोपर्डे या गावांमधून पुढे फलटण तालुक्याकडे जाणार आहे.
तर सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यामधून सालपे, शेरेचीवाडी, हिंगणगाव, आदर्की बी. के., कोपर्डे या गावांमधून पुढे मार्ग होणार आहे.
नव्याने करण्यात येणारा पुणे ते बेंगलोर हरित महामार्ग फलटण तालुक्याच्या सालपे, शेरेचेवाडी, हिंगणगाव, आदर्की या भागांमधून जात असल्याने आगामी काळामध्ये फलटण तालुका चारही बाजूने विविध महामार्ग जात आहेत. यामुळे हायवे वरील तालुका अशी नवीन ओळख फलटण तालुक्याला मिळणार आहे.
आळंदी ते पंढरपूर या पालखी महामार्गाचे काम सध्या फलटण तालुक्यामध्ये मोठ्या ताकतीने सुरू आहे. याबरोबरच अहमदनगर ते चिकोडी हा महामार्ग सुद्धा फलटण तालुक्यामधून जाणार असल्याची चर्चा गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. त्यासोबतच आता तालुक्याच्या पश्चिम भागांमधून पुणे ते बेंगलोर हरित महामार्ग जात असल्याने फलटण तालुक्याच्या चारही बाजूंनी विविध महामार्ग जात आहेत. त्यामुळे फलटण तालुक्याला हायवे वरील तालुका अशी ओळख मिळणार आहे.